बोल्हेगावला पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा नागरी सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत मतदारांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे असते. तर त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरण्यासाठी प्रमाणिकपणे योगदान द्यावे लागते. विरोधकांचे चांगल्या कामात आडकाठी आणण्याचे काम सातत्याने सुरु असते, मात्र चांगल्या भावनेने केलेल्या कामाला सर्वांची साथ मिळत असते. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते पतसंस्थेत निवडून आलेल्या संचालकांवर सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे काम करण्याची मोठी जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी केले.
बोल्हेगाव येथे पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे पाटील व डॉ. संतोष गांगर्डे यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित चेअरमन किशोर गांगर्डे, व्हाईस चेअरमन दिपक वाघ, संचालक संभाजी निमसे, विशाल सरोदे, संतोष जायभाय, रविंद्र यादव, दत्तात्रय गडाख, संदीप शेरकर, महेश भावसार, अमृता पोळ, अर्चना गायकवाड, जगदीश वाघ यांचा सत्कार कुमारसिंह वाकळे व डॉ. गांगर्डे यांनी केला. या कार्यक्रमासाठी नगरसेवक अॅड. राजेश कातोरे, सुभाष बारस्कर, रमेश वाकळे, संतोष वारमोडे, दशरथ वाकळे, भाऊ कापडे, बिपीन काटे, सुनिल भालेराव, संदीप गांगर्डे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, निमगाव गांगर्डाचे सरपंच अशोक ढगे, माजी सरपंच आनंदराव गांगर्डे, दिलीप गांगर्डे, प्रा. साठे, प्रा. नानाभाऊ गांगर्डे, किशोर गांगर्डे, डॉ. भुषण अनभुले, रावसाहेब गलांडे, माजी जि.प. सदस्य परमवीर पांडुळे, गणेश शेलार, अॅड. प्रसाद गांगर्डे, नवनाथ कोलते, विकी तिवारी, पंकज वाकळे, बबन पाटील, अनिल पांडुळे, श्रीकांत गांगर्डे आदींसह निमगाव गांगर्डा, मांदळी, कोंभळी ग्रामस्थ व बोल्हेगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात संदीप गांगर्डे यांनी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची पतसंस्थेची व्याप्ती व कार्याची माहिती दिली. पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे यांनी संपूर्ण विकास पॅनलवर सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी बँकेच्या विकासात्मक दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. भूमिपुत्रांचा मानसन्मान होताना जबाबदारी देखील वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच अशोक ढगे यांनी सर्व पॅनलच्या संचालकांनी एकजुटीने कारभार पहाण्याचे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना चेअरमन किशोर गांगर्डे म्हणाले की, अनेक वर्षापासून बोल्हेगावला राहत असताना कुमारसिंह वाकळे यांनी केलेल्या विविध विकास कामांचा साक्षीदार राहिले. पोलीस कॉलनीत पहिला डांबरीकरण रस्ता त्यांनी करुन दिला होता. या परिसरात नागरिकांचे प्रश्न तळमळीने सोडविणारे नगरसेवक असल्याने या परिसराचा झपाट्याने विकास झाला. माणसाला माणूस म्हणून जोडूत गेल्याने व नवीन चेहर्यांना संधी दिल्याने सर्व संचालकांचा मताधिक्याने विजय झाला. सभासदांकडून मोठ्या अपेक्षा असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपत बारस्कर म्हणाले की, मोठ्या संख्येने पॅनल निवडून येणे, ही केलेल्या कामाची खरी पावती आहे. लोकसेवा या भावनेने काम केल्यास बँकेसह सर्वांची भरभराट होणार आहे. बँकेप्रमाणे प्रभागात देखील विरोधकांची विकासाला खीळ बसविण्याचा प्रयत्न असतो, मात्र न डगमगता पुढे गेल्यास सक्षम नेतृत्वाचा उदय होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज वाकळे यांनी केले. आभार दिपक गांगर्डे यांनी मानले.