जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाचा उपक्रम
शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत फुले दांम्पत्यांनी पोहोचवली -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाचा पाया रोवून महात्मा फुले यांनी समाजात स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. बहुजन समाजाला वैचारिक गुलामगिरीतून काढण्यासाठी शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत फुले दांम्पत्यांनी पोहोचवली. महात्मा फुले खर्या अर्थाने शिक्षणमहर्षी आहेत. त्यांनी शिक्षणातून सदृढ समाजाची निर्मिती केल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे आयोजित मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर, प्रबोधनात्मक व्याख्यान आणि संस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. दिवसभर चाललेल्या या सामाजिक उपक्रमास माजी महापौर भगवान फुलसौंदर, महापौर रोहिणीताई शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, किशोर डागवाले, प्रा. सुनिल जाधव, मंगलताई भुजबळ, अॅड. धनंजय जाधव, नगरसेवक प्रकाश भागानगरे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, अनुराधा झगडे, सचिन गुलदगड, दत्ता जाधव, प्रा. माणिक विधाते, अॅड. अनिता दिघे, नगरसेवक महेंद्र (भैय्या) गंधे, अॅड. अभय आगरकर, अॅड. सुनिल तोडकर, अनिल साळवे, सचिन साळवी, डॉ. संतोष गिर्हे, विष्णुपंत म्हस्के, अश्विनी वाघ, जयेश शिंदे, स्वाती डोमकावळे, आरती शिंदे, पोपट बनकर, विनोद साळवे, दत्ता वामन, राम कराळे, अनंत द्रवीड, मुख्य संयोजक अॅड. महेश शिंदे, जयश्री शिंदे आदि उपस्थित होते.

महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या की, समाजातील विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या विचारांचा अंगीकार केल्यास त्यांना कृतीशीलपणे अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, अनंत यातना सोसून त्यांनी शिक्षणाची संजीवनी समाजाला दिली. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील विषमता पाहून परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी शाळा सुरु केल्या. त्यांचा जयंती उत्सव दीन-दुबळ्यांची सेवा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नागरिकांचे रक्तगट, हिमोग्लोबीन तपासणी, नेत्रतपासणी करण्यात आली. मोतिबिंदू असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. पुंडे सर यांनी प्रबोधनात्मक व्याख्यान दिले व मंदाताई फुलसौंदर, कान्हू सुंबे यांनी गीत गायनातून प्रबोधन केले. बाल सावित्रीच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकलीने महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला.
सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणार्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये नेत्रचळवळीतील योगदानाबद्दल माजी सैनिक शिवाजी वेताळ, मानवसेवाच्या माध्यमातून अनाथांचा सांभाळ करणारे प्रा. सुनिल मतकर, जिल्हा बँकचे व्यवस्थापक सुहास सोनवणे, नानासाहेब दानवे, जिल्हा बँकेच्या महिला बचतगट कक्ष अधिकारी विद्या तन्वर या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार आमदार जगताप यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक कन्हेरकर, भारती शिंदे, डॉ. अमोल बागुल, जालिंदर बोरुडे, विनायक नेवसे, कांचन लद्दे, दिनेश शिंदे, बाबू काकडे, अशोक कासार आदींनी परीश्रम घेतले. या उपक्रमास जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले, विशाल गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले.