महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशवाट दाखविली -अनिल शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाच्या क्रांतीने महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशवाट दाखविली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा त्यांनी पुढे नेला व त्यांचे कार्य समाजापुढे आणले. समाजाच्या उद्धारासाठी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी समाजाला दिशा दिल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, रणजित परदेशी, ओंकार शिंदे, महेश लोंढे, चंद्रकांत (काका) शेळके, अनिकेत कराळे, विकी लोखंडे, विशाल शितोळे, आनंद मोकाटे, ओंकार फुलसौंदर, प्रल्हाद जोशी, प्रनिल शिंदे आदी उपस्थित होते.

शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, समाजात क्रांती घडविण्यासाठी दूरदृष्टी ठेवून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाने परिवर्तन घडविले. अनेकांचा विरोध झुगारुन समाजाच्या कल्याणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची चळवळ चालवली. महिला शिकल्याने समाजाची आज प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
संपर्क प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, शिवसेना फुले, शाहू, आंबेडकर विचाराने कार्य करत आहे. समाजाच्या उद्धारासाठी महात्मा फुले यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. या महापुरुषांचे विचार समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.