अन्यथा नगर रचना सहसंचालक (नाशिक) कार्यालयासमोर सोमवारी उपोषण
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- उपोषणाची दखल घेऊन नगर रचना विभाग (पुणे) संचालकांनी सात दिवसात तत्कालीन नरगर रचनाकार गैरव्यवहार तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक सहसंचालकांना अहवाल सादर करण्याचे सूचना केल्या असताना, सदर अहवाल सोळा दिवस उलटून देखील सादर न केल्याने नगर रचना सहसंचालक (नाशिक) कार्यालया समोर सोमवार (दि.10 एप्रिल) पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे. याबाबत रोडे यांनी नुकतेच नगर रचना सहसंचालकांना (नाशिक) निवेदन दिले.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग अहमदनगर कार्यालयात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कामे झाली आहे. या प्रकरणी बदली होऊन गेलेला तत्कालीन नगर रचनाकार त्याला जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. क्षेत्र अकृषक करताना, रेखांकन मंजुरी देताना, क्षेत्रधारकांच्या सोयीने ओपन स्पेस व अॅमिनिटी स्पेस सोडणे, प्लॉट धारकांचा कसलाही विचार न करता अंतर्गत रस्ते जोडणे, त्याबरोबर नदी, ओढे, नाले या नैसर्गिक प्रवाहापासूनचे अंतर सोडण्याच्या नियमांना तिलांजली देत क्षेत्रधारकांच्या म्हणण्यानुसार रेखांकन व इतर कामांना मंजुरी देण्याची तक्रारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.
यासंदर्भात चौकशी करुन तत्कालीन नगर रचनाकार यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी नगर रचना विभाग (पुणे) संचालकांच्या कार्यालया समोर संघटनेच्या वतीने 23 मार्च रोजी उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेऊन नगर रचना विभागाचे संचालक वि.दुं. तळपे यांनी तक्रार अर्जाच्या अनुषंगाने नगर रचना सहसंचालक (नाशिक) यांना सात दिवसात अहवाल सादर करण्याचे लेखी पत्र काढले आहे. मात्र सोळा दिवस उलटून देखील अहमदनगर महानगरपालिकेतील नगर रचना विभाग व आयुक्त या संदर्भात हालचाल करत नसून, त्यांच्याकडून अहवाल येण्यास टाळाटाळ होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. हा अहवाल नगर रचना विभाग (पुणे) संचालकांना सादर न केल्यास सोमवार पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.