सावेडीला रंगला मुला-मुलींचा फुटबॉल सामन्याचा थरार
पराभवाचा सामना करण्याचे बळ खेळातून निर्माण होते -नरेंद्र फिरोदिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- मैदानी खेळाने जीवनात खेळाडूवृत्ती निर्माण होते. पराभवाचा सामना करण्याचे बळ खेळातून निर्माण होते. युवक-युवतींना भविष्यातील वाटचालीसाठी हे आवश्यक आहे. खेळाडू हा जीवनातील कोणत्याही कठिण परिस्थितीवर मात करून पुढे जात असतो, असे प्रतिपादन उद्योजक तथा अहमदनगर फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यासाठी माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू व एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी फिरोदिया बोलत होते. अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीने एटी फाऊंडेशनच्या सहकार्याने घेतलेल्या या प्रशिक्षण वर्गाला फुटबॉल खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक हसन शेख, राष्ट्रीय फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर, शिबिराच्या संयोजिका तथा एडीएफएच्या सदस्या पल्लवी सैंदाणे, एएसआयचे व्हिक्टर जोसेफ आदींसह खेळाडू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे फिरोदिया म्हणाले की, शहरात फुटबॉल खेळ वाढत आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मैदानी खेळात फिटनेस व संयम महत्त्वाचा असून, फुटबॉलसाठी कमी वयाचे खेळाडू प्रशिक्षणानंतर चांगले खेळाडू म्हणून पुढे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंजू तुरंबेकर म्हणाल्या की, अहमदनगर मध्ये फुटबॉलचे उत्तम खेळाडू असून, त्यांच्यात पुढे जाण्याची क्षमता आहे. राज्यात देखील अहमदनगरचा संघ पुढे जाऊ शकतो, यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण व सरावाने स्वत:च्या खेळाचा विकास साधण्याची गरज आहे. स्पर्धा निर्माण केल्यास फुटबॉलला चांगले दिवस येणार असल्याचे सांगितले. तर शहरातील खेळाडूंसाठी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीची शाखा सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव म्हणाले की, नगरच्या मातीतून अनेक दिग्गज खेळाडू घडलेले आहेत. मातीशी नाळ जोडलेला खेळाडू भविष्यात चमकतो. आयुष्यात प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे. पालक वर्ग देखील करियरच्या दृष्टीकोनाने खेळाकडे पाहत आहे. खडतर प्रशिक्षणाने खेळाडू घडत असतो. खेळाडूंमध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक हसन शेख यांनी खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रशिक्षण वर्गाचा समारोप सावेडीच्या अल्फा टर्फ मैदानावर मुला-मुलींच्या विविध वयो गटातील रंगतदार फुटबॉलच्या सामन्यांनी झाला. मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला होता. खेळाडूंनी प्रशिक्षणात शिकवलेल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली. या सामन्यातील विजेत्या संघांना उपस्थितांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गास जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले व क्रीडा महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी भेट देऊन घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रशिक्षणात सहकार्य करणारे अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या प्रशिक्षिका भक्ती पवार, शहरातील स्थानिक प्रशिक्षक प्रसाद पाटोळे, सुभाष कनोजिया, सिचन पाथरे, फारुक शेख, अभिषेक सोनवणे, अक्षय बोरडे, जॉय जोसेफ आदी सहाय्यक प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या फुटबॉल प्रशिक्षण वर्गाला गुलमोहर फुटबॉल क्लबचे अध्यक्ष तथा उद्योजक जोएब पठाण, उपाध्यक्ष डॉ. प्रताप पठारे यांचे विशेष सहकार्य मिळाले.