• Fri. Mar 14th, 2025

कॅच द रेन ऑनलाईन कार्यकर्ता प्रशिक्षणात पाणी बचतीचा संदेश

ByMirror

Mar 27, 2023

नेहरु युवा केंद्र व जय युवा अकॅडमीचा उपक्रम

पाण्याचा वापर जपूनच, नाहीतर सर्व सृष्टीचा विनाश नक्की -अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाणी हेच जीवन आहे, पाण्याचा वापर सर्वांनी जपूनच केला पाहिजे. नाहीतर सर्व सृष्टीचा विनाश नक्की आहे. मानवी जीवनासाठी पाणी अत्यावश्यक आहे. पिण्यायोग्य पाणी संपल्यास सजीव जिवंत राहू शकणार नाही. पाण्याची बचत केली तरच मनुष्याला सुखी व आनंदी जीवन जगता येणार असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर यांनी केले.


नेहरु युवा केंद्र व जय युवा अकॅडमीच्या वतीने कॅच द रेन विषयावर ऑनलाईन कार्यकर्ता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. तोडकर महाराज बोलत होते. याप्रसंगी जय युवाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, पाटबंधारे विभागाचे अशोक कासार, रयतचे पोपट बनकर, उडानच्या अध्यक्षा आरती शिंदे, दिनेश शिंदे आदी चर्चासत्रात सहभागी झाले होते.


अ‍ॅड. महेश शिंदे यांनी जल है तो कल है!, याप्रमाणे पाणी शिल्लक राहिले तरच उद्याचा काळ आपण पाहू शकतो. दैनंदिन वापरातील पाण्याचे पुनर्भरण करण्याकरिता पाणी जिरवण्याचे त्यांनी आवाहन केले.


डॉ. अमोल बागुल म्हणाले की, पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे किंवा ते तेथेच जिरवले पाहिजे. आजकाल सर्व काही नव्याने तयार करता येते. परंतु पाणी निर्माण करण्याची यंत्रणा अद्यापही मानवाला शक्य झाली नाही. पाण्यासाठी तिसरे महायुद्ध घडू शकते, म्हणून पाणी बचतीची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाचे अशोक कासार यांनी शेतीला पाणी वापरताना शेतीच्या दंडातून सोडण्याऐवजी ड्रिप लावून सोडले तर अतिरिक्त पाणी वाया जाणार नाही. पिकांच्या मुळाला पुरेल एवढेच पाणी ठिबकद्वारे सोडावे, त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. पावसाचे पाणी आडवून शेतात जिरवले तर भूजल पातळी निश्‍चित वाढून पीक देखील चांगले येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोपट बनकर यांनी शालेय अभ्यासक्रमात तसेच कृतीद्वारेही पाणी पुनर्भरण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावली तर भविष्यात पाण्याची अडचण भासणार नाही. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. ओढे, नद्या, कालवे, बंधारे यांची स्वच्छता ठेवल्यास पाणी दूषित होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


या ऑनलाइन प्रशिक्षणात अनेक युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *