संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा रामवाडी येथील एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यालय येथे शिवसेना संलग्न राष्ट्रीय कर्मचारी संघटना (एस.टी. विभाग) शाखेच्या फलकाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या हस्ते करण्यात आले. तर संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख अंकुश चितळे, चंद्रकांत (काका) शेळके, पाथर्डी तालुकाप्रमुख विष्णू ढाकणे, राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणी उपाध्यक्ष अॅड. पुष्पा येळवंडे, कार्याध्यक्ष माधव मुंडे, सरचिटणीस देवानंद गरुड, प्रकाश निंबाळकर, पंकज वालावलकर, अजयकुमार गुजर, संजय पोवार आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय कर्मचारी संघटना शाखेचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रास्ताविकात पुष्पा येळवंडे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली.
बाबुशेठ टायरवाले यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतिहासाला उजाळा देऊन, पुन्हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप सातपुते म्हणाले की, एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही. पूर्वी या कर्मचार्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. तर अनेकांनी आत्महत्या केल्या. मात्र, शिवसेनेच्या काळात त्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे. कामगार हिताचे निर्णय घेऊन त्यांना आधार दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अहमदनगर विभाग कार्यकारणी अध्यक्षपदी ब्रम्हदेव जायभाय, ओमकार सातपुते, सचिवपदी संदीप बोळगे, विष्णू घुले, कार्याध्यक्षपदी बाबासाहेब सांगळे, उपाध्यक्षपदी शंकर ढवळे, कोषाध्यक्षपदी संतोष हुलगे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित रोकडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते.