इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार
2024 वर्ष राष्ट्रीय डिच्चूकावा वर्ष स्विकारण्याचा आग्रह
अहमदनगर (प्रतिनिधी)- चांगले उमेदवार निवडून येण्यासाठी व आमीष दाखवून, जाती-धर्माच्या नावाने निवडून येणार्या सत्तापेंढारींना सत्तेतून कायमचे पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने 2024 वर्ष राष्ट्रीय डिच्चूकावा वर्ष स्विकारण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. यासाठी संघटनेच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय डिच्चूकावा जागर अभियान सुरु करण्यात आले असल्याची माहिती कॉ. बाबा आरगडे व अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
भारतीय संविधानाचे कलम 326 खाली 18 वर्षावरील कोणत्याही भारतीय नागरिकाला सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान मत देण्याचा घटनात्मक अधिकार असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याच प्रकारे निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवारांना नाकारण्याचा म्हणजेच डिच्चूकावा करण्याचा अधिकार सुद्धा भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत उन्नत चेतनाधारी राष्ट्रकर्त्याला मतदारांनी जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे. त्याच वेळेला तमस चेतनाधारी सत्तापेंढारी विरुद्ध डिच्चूकावा करून त्यांना सत्तेतून कायमचे खाली खेचले पाहिजे, अशी आग्रही भूमिका समोर ठेऊन राष्ट्रीय डिच्चूकावा जागर अभियान सुरु राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या लोकशाहीत तत्वप्रणालीत संपूर्ण देशाने महात्मा गांधीजींचा अहिंसा मार्ग व कायद्याप्रमाणे नागरी जीवन जगण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे सत्तापेंढारींना कायमचा डिच्चू देणे हा प्रत्येक मतदाराचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे निरंतर राष्ट्रीय कर्तव्य योगाचा भाग म्हणून प्रत्येक मतदाराने मतदान करण्याअगोदर कोणाला मतदान करायचे व कोणाविरुध्द डिच्चूकावा करायचा? याबाबतचा निर्णय अंतरात्म्याने केला पाहिजे. तरच चांगले उमेदवार निवडून येतील व संपूर्ण समाज तमस चेतनेच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
इंग्रजांना हाकलून देऊन देशवासियांनी सत्तापेंढारींच्या ताब्यात हा देश दिला आहे. यामुळे देशात गरिबी, दारिद्र्य, झोपडपट्ट्या वाढत आहे. कोट्यावधी लोकांना घरे नाहीत, कोट्यावधी लोकांना रोजगार नाही, स्त्रियाविरुद्धचा अन्याय वाढत आहे. एकंदरीत 21 व्या शतकात तमस चेतना प्रवृत्तीने उच्चांक गाठला असल्याचे कॉ. बाबा आरगडे यांनी म्हंटले आहे.
सत्तापेंढारींना सत्तेतून कायमचे पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय डिच्चूकावा जागर अभियान सुरु करण्यात आले असून, यासाठी अॅड. गवळी, कॉ. आरगडे, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. महेबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम, तुकाराम बोरगे आदी प्रयत्नशील आहेत.
