कांशीराम यांनी उपेक्षितांचे नेतृत्व केले -सुनील ओव्हाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- कांशीराम यांनी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य केले. बहुजन समाजाचे हित जोपासून, त्यांनी नेहमी उपेक्षितांचे नेतृत्व केले. सत्तेतून उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील ओव्हाळ यांनी केले.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम यांची जयंती शहरातील सेंट सेव्हिअर्स हायस्कूल व वस्तीगृहात सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी ओव्हाळ बोलत होते. प्रारंभी कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, मेजर राजू शिंदे, सलीम अत्तार, प्राचार्य ज्योत्स्ना शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख अप्पासाहेब पंडित, गणेश क्षत्रिय, प्रशांत गायकवाड, अनिता वाजे, पूजा दुडगू, शिरीन इनामदार, अर्जुन चव्हाण, ठोंबरे सर, रामचंद्र पवार, गणेश बागल, नंदलाल परदेशी, रामशंकर यादव, अजित यादव आदी उपस्थित होते.
उमाशंकर यादव म्हणाले की, बहुजन समाजाच्या हातात सत्ता देण्याचे काम कांशीराम यांनी केले. त्यांच्या विचाराने बहुजन समाज पार्टी दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी कार्य करत आहे. फुले, शाहू, आंबेडकर ही विचारधारा घेऊन राजकारणात पक्ष योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांना कांशीराम यांच्या संघर्षमय जीवन चरित्राची माहिती देण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना फळ व बिस्किटचे वाटप करण्यात आले.