शहरातील सात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स मिडटाऊन व डॉ. अनभुले मेडिकल फाऊंडेशनच्या शहरातील विविध क्षेत्रातील सात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणार्या स्त्री शक्तीला सलाम करण्यात आले.
अनभुले मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले, संचालिका डॉ. दिपाली अनभुले यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव प्रसाद मांढरे, कोषाध्यक्ष संदीपसिंग चौहान, श्रीकांत मांढरे, संपुर्णा सावंत, डॉ. कल्पना ठुबे, अॅड. सुनंदा तांबे, प्राचार्या शोभा भालसिंग, शारदा पवार आदी लायन्सचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोहिनूर मॉलच्या संचालिका श्वेता अश्विन गांधी, योग विधाधामच्या योग शिक्षिका मिना देशपांडे, न्यू लॉ कॉलेज येथे गेली दहा वर्षापासून प्राध्यापक असलेल्या अॅड. स्वप्नाली सौरभ काकडे, कलारंग ड्राईंग अकॅडमीच्या संस्थापिका सुजाता पायमोडे, साहित्य, वैद्यकीय, सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या डॉ. क्रांतीकला रावसाहेब अनभुले तसेच प्राचार्य रेबिका घागरे व विभावरी शिंदे यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. दिपाली अनभुले यांनी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन करुन महिलांमध्ये वाढते कर्करोग व ब्रेस्ट कॅन्सरची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरी जोशी यांनी केले.