मुलींना उच्च शिक्षणाने सक्षम करा -शर्मिला गोसावी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एक महिला शिकली तर, ती दोन्ही कुटुंब सक्षम करू शकते. यासाठी आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षणाने सक्षम करण्याचे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राज्य संघटक तथा कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, लाल बावटा विडी कामगार युनियन शहर शाखेच्या वतीने श्रमिकनगर मध्ये विडी कामगार महिलांसह महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी गोसावी बोलत होत्या. ज्येष्ठ विडी कामगार महिला कॉ. शोभा पासकंठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विडी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अॅड. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, सोनाली दुल्लम, संगीता कोंडा, भाग्यलक्ष्मी गड्डम, रेणुका अंकाराम, लक्ष्मीबाई कोटा, शारदा बोगा, कमलाबाई दोंता, निर्मला न्यालपेल्ली, सुनंदा पेद्राम, प्रीती दिकोंडा उपस्थित होत्या.
पुढे शर्मिला गोसावी म्हणाल्या की, आपले दररोजचे कामकाज सांभाळून स्वतःसाठी व स्वतःचे छंद जोपासण्यासाठी काही वेळ काढायला हवा, आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक सक्षमीकरणाची आवश्यकता असून, महिलांनी त्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. सुधीर टोकेकर म्हणाले की, विडी कामगारांची चळवळ चालविताना एक प्रकारे महिलांचे सक्षमीकरण केले जात आहे. या वर्गात महिला मोठ्या संख्येने जोडले गेलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. भारती न्यालपेल्ली यांनी प्रास्ताविकात म्हणाल्या की, विड्या वळून अनेक महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. विडी कामगार महिलांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करुन त्यांना समाजात मोठे केले असून, या महिला एक प्रेरणा आहे. महिला दिनी त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुनील गोसावी यांनी बचत गटांचे महत्व समजावून सांगितले. यावेळी महिलांना भेट वस्तूंचे पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सगुणा श्रीमल यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.