राजकारणापलीकडे जाऊन गलांडे यांचे सामाजिक कार्य सुरू -बाबासाहेब भिटे
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांचा वाढदिवस वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसह साजरा करुन, इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, योगेश गलांडे, दत्ता तापकिरे, अशोक शेळके, शंकर शेळके, सुनिल शेवाळे, दिपक गीते, अमित बारवकर, विवेक घाडगे, सागर गलांडे, वैष्णव गलांडे, राहुल शेवाळे, अमोल घुटे, गौरव पाटोळे, दिपक परभणे, वसिम शेख, संतोष शेवाळे, संग्राम राऊत आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेब भिटे म्हणाले की, राजकारणापलीकडे जाऊन गलांडे यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. सर्वसामान्य कामगारांच्या हितासाठी त्यांचा संघर्ष सुरू असून, त्यांची सुरू असलेली कामगार चळवळ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

योगेश गलांडे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील घटक असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज असून, आपल्या आनंदात त्यांना समाविष्ट करुन प्रेम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

