महिला दिनानिमित्त झाला सन्मान
जिल्ह्यात चर्मकार समाजातील पहिली महिला बँक अधिकारी होण्याचा मिळवला मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या बँकिंग परीक्षेत यश संपादन करुन राष्ट्रीयकृत बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती झालेल्या सुश्मिता शिंदे यांचा महिला दिनानिमित्त रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री, अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ व शब्दगंध साहित्यिक परिषद शेवगाव शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्ह्यामध्ये चर्मकार समाजातील पहिली महिला बँक अधिकारी होण्याचा मान शिंदे हिने मिळवला आहे.

या सत्कार सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वैभव रोडी, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे शेवगाव तालुकाध्यक्ष हरीभाऊ नजन, चर्मकार विकास संघाचे तालुकाध्यक्ष संतोष कगंणकर, सलिम शेख, भाऊसाहेब पाचरणे, दिनेश तेलुरे, रावसाहेब सातपुते, उध्दव गुजर, संतोष कानडे, संदिप सोनवणे, मच्छिंद्र शिंदे, दमयंती शिंदे, सुरेखा कानडे, कमल कानडे, सिध्दांत शिंदे, स्नेहल कानडे, सोहम कानडे आदिनाथ पालवे, रमेश पवार आदी उपस्थित होते.
भातकुडगांव (ता. शेवगाव) या छोट्याश्या गावातील शिंदे कुटुंबातील मच्छिंद्र विठ्ठल शिंदे व दमयंती शिंदे याची ती मुलगी आहे. सुश्मिता शिंदे हिचे महाविद्यालयीन शिक्षण शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात झाले असून, बीएससी फिजिक्स या विषयात शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने बॅकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी अभ्यास सुरू केला. बँक क्षेत्रातील अनेक परिक्षा देत तिची आयडीबीआय या राष्ट्रीयकृत बँकेच्या असिस्टंट मॅनेजर पदी नियुक्ती झाली आहे. उपस्थितांनी तिने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.