भारतीय वनसेवा अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल केळगंद्रे यांचा ढोर समाजाच्या वतीने सन्मान
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानास युवक-युवतींचा प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, ज्ञानाने प्रकाशमान होऊन स्वत:चे अस्तित्व सिध्द करता येते. स्पर्धा परीक्षेत कोणतीही कोचिंग क्लास न लावता यश मिळवता येते. यासाठी स्वत:मध्ये जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षेत आलेल्या अपयशाने खचून न जाता, सातत्य ठेऊन योग्य दिशेने वाटचाल करणे हीच यशाची गुरुकिल्ली असून, कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला भारतीय वन सेवा अधिकारीपदी नियुक्त झालेले श्रीकांत केळगंद्रे यांनी दिला.

भारतीय वनसेवा अधिकारी पदी (आय.एफ.एस.) श्रीकांत भानुदास केळगंद्रे याची निवड झाल्याबद्दल वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित युवक-युवतींना मार्गदर्शन करताना केळगंद्रे बोलत होते. मार्केटयार्ड येथील किसान क्रांती इमारतीच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी सैनिक भानुदास केळगंद्रे, भूमी अभिलेख अधिकारी गजानन पोळ, उपाध्यक्ष बाबासाहेब त्रिंबके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे केळगंद्रे यांनी परीक्षेचा अभ्यास कसा करावा?, मुलाखत कशी द्यावी? व स्पर्धे परीक्षेची तयारी कशी करावी? या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रारंभी श्रुती बोराडे या विद्यार्थिनीने करुन स्वागत गीत व पसायदान सादर केले. उपस्थितांच्या हस्ते श्रीकांत केळगंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. भूमी अभिलेख अधिकारी गजानन पोळ म्हणाले की, स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना नियोजन महत्त्वाचे आहे. तुम्ही अभ्यास किती वेळ करता?, यापेक्षा कशा पध्दतीने करता याला महत्त्व आहे. या क्षेत्रात योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास यश लवकर प्राप्त करता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रमेश त्रिमुखे म्हणाले की, चांदा (नेवासा) येथील सर्वसामान्य कुटुंबातील श्रीकांत केळगंद्रे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन, त्यांची भारतीय वन अधिकारी या उच्च पदावर निवड झाली आहे. त्यांनी मिळवलेले यश समाजासाठी भूषण व युवक-युवतींना प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशाची वाटचाल इतरांना प्रेरक ठरण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव, महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोकणे व सुभाष बोराडे यांनी केले. आभार मनीषा शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश नारायणे, अनिल त्रिमुखे, विनोद इंगळे, सुरेंद्रकुमार बोराडे, प्रशांत डहाके, राजू कोकणे, संजय खरटमल, संजय कवडे, प्रवीण त्र्यंबके यांनी परिश्रम घेतले.