युवक-युवतींसह हातात झाडू घेऊन पदाधिकार्यांचा सहभाग
निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक -प्रा. अशोक डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील लालटाकी अप्पूहत्ती चौक ते दिल्लीगेट परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. निरोगी आरोग्य व आरोग्यदायी वातावरणासाठी नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन करीत महाविद्यालयीन युवक-युवतींसह हातात झाडू घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा चालक या मोहिमेत सहभागी झाले होते.
काही तासातच सदर रस्त्याचा परिसर स्वच्छ करुन मोठ्या प्रमाणात आजूबाजूला साचलेले प्लास्टिक व इतर कचर्यांचे संकलन करुन परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी संघटन मंत्री प्रा. अशोक डोंगरे, शहर कार्याध्यक्ष भरत खाकाळ, दिलीप घुले, गणेश मारवाडे, कदम आदी उपस्थित होते.

प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, परिसर स्वच्छ असल्यास रोगराई न पसरता नागरिकांचे आरोग्य निरोगी राहणार आहे. निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक असून, याची सुरुवात स्वत:पासून होणे गरजेचे आहे. घराप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास स्वच्छ भारताचे स्पप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भरत खाकाळ म्हणाले की, जीवन आरोग्यमयी होण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. अस्वच्छतेने रोगांना निमंत्रण मिळत आहे. नागरिकांनी स्वच्छतेसाठी जागरुक राहिल्यास सर्वांना निरोगी व आनंदी जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.