अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षाखालील मुलांची फुटबॉल टूर्नामेंट उत्साहात पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस या फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता. यामध्ये फुटबॉल क्लबसह शालेय 16 संघांचा सहभाग लाभला.
या टूर्नामेंटचा अंतिम सामना नमोह फुटबॉल विरुद्ध गुलमोहर फुटबॉल क्लब या संघात झाला. या अटीतटीच्या सामन्यात गुलमोहर फुटबॉल क्लबने 3-1 गोलने नमोह फुटबॉल संघावर विजय मिळवला. तर तिसर्या क्रमांकासाठी गुलमोहर संघ अ विरुध्द शिवाजीयन्स एफसी यांच्यात सामना रंगला होता. यामध्ये गुलमोहर संघाने विजय मिळवून तिसर्या स्थानी राहिले. या टूर्नामेंटमध्ये नवोदित खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.
डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. फुटबॉल असोसिएशनचे कमिटी मेंबर व्हिक्टर जोसेफ, जोएब खान, पल्लवी सैंदाणे यांच्या उपस्थितीमध्ये विजयी संघासह उपविजयी व तृतीय क्रमांकाच्या संघाला चषक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपर- सार्थक दौड (फिरोदिया शिवाजीयन्स), बेस्ट हाफ- आदित्य गुगळे (गुलमोहर एफसी), बेस्ट स्ट्राईकर- विराज चौहान (एनएफसी), बेस्ट प्लेयर- अभिमन्यू भगत बेस्ट (गुलमोहर एफसी) यांना बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून सागर चेमटे, गणेश शिंदे, रिशी कनोजीया, जॉयल पिल्ले, ओम दंडवते, प्रणव आठवले, अथर्व सानप, योगेश तुपे, मंथन शिंदे यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंची जिल्हास्तरीय संघासाठी निवड करण्यात आली आहे.
फुटबॉल असोसिएशनचे मनोज वाळवेकर, गॉडवीन डिक, रुनप फर्नांडिस यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीश शुभेच्छा दिल्या. तर उन्हाळी सुट्टीत फुटबॉल स्पर्धा घेण्याचे जाहीर केले. या स्पर्धेला प्रसाद पाटोळे, सुभाष कनोजिया यांचे सहकार्य लाभले.
