• Sat. Sep 20th, 2025

आरोग्य, शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्‍नावर एकवटणार असंघटित कामगार

ByMirror

Feb 28, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे 20 मार्चला जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळाव्याचे आयोजन

विश्‍वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने मेळाव्यात सहभागी होण्याचे कामगारांना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- असंघटित कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्‍नावर सोमवार दि.20 मार्च रोजी शहरातील टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळावा घेण्याचा निर्णय विश्‍वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नुकतीच ही बैठक कामगार प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी संघटनेचे संस्थापक सचिन साळवे, अध्यक्ष उत्तम भिंगारदिवे, जिल्हाध्यक्ष नागेश भिंगारदिवे, अशोक मोरे, दत्ता शिंदे, दीपक गायकवाड, मंगेश जावळे, सुनिल साळवे, संजय जाधव आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.


या मेळाव्याच्या माध्यमातून असंघटित कामगारांमध्ये त्यांच्या न्याय, हक्काची जागृती करण्यात येणार आहे. या मेळाव्यात ऊस तोड, बांधकाम कामगार, नाक्यावरील कामवार, शेतमजूर आदी असंघटित कामगारांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदवून, कामगारांच्या प्रश्‍नांची दखल घेतली न गेल्यास सर्व कामगारांना एकजुट करुन सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत मेळाव्यात चर्चा होणार आहे.


सचिन साळवे म्हणाले की, जातीपातीच्या राजकारणात गुंतलेल्या सरकारला सर्व सामान्य कामगारांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. कामगारांना गुलाम सारखी वागणूक दिली जात आहे. कामगार विरोधी धोरणामुळे सर्वच कामगारांचे भविष्य उध्वस्त होत असून, त्यांचे जीवन अंधकारमय बनले असल्याचे त्यांनी सांगितले.


उत्तम भिंगारदिवे म्हणाले की, अर्थचक्राचा मूलभूत पाया कामगार असून, त्या कामगारांची उपासमार सुरू आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने सर्व असंघटित कामगारांना दारिद्रयरेषेखालील रेशनकार्ड द्यावे व मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी घेण्याची प्रमुख मागणीसाठी संघटना शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *