शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने खेळाडूंचा सन्मान
तीन महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर झाली परीक्षा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मोटीव मार्शल आर्टस फिटनेस अॅण्ड स्पोर्टस अंतर्गत शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे पंच प्रशिक्षण परीक्षेत शहरातील बारा खेळाडूंनी यश संपादन केले. पंच प्रशिक्षण परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख व स्थायी समितीचे सदस्य सुनिल त्र्यंबके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
शहरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सीमध्ये झालेल्या या सन्मान सोहळ्यासाठी कराटे फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष गौस शेख, पोलीस नाईक सचिन धोंडे, गणेश पाटील, राष्ट्रीय खेळाडू कपिल गायकवाड, राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू कोमल शिंदे, मनिषा निमोनकर, तायक्वांदोचे प्रशिक्षक अल्ताफ शेख, अकिब पठाण, सचिन कोतकर, नुर शेख, फिरोज शेख, मुहाफिज सय्यद आदी उपस्थित होते.
मुकुंदनगरमध्ये शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर मोटीव मार्शल आर्टस फिटनेस अॅण्ड स्पोर्टस अंतर्गत नुकतेच कराटे पंच प्रशिक्षण परीक्षा घेण्यात आली. तीन महिन्यांचे खेळाडूंना खडतर प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा पार पडली. यामध्ये उत्तीर्ण खेळाडूंना पंच म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. यामध्ये अर्शद सय्यद, मुख्तार सय्यद, कलिम शेख, जहीन पटेल, शाहरुख शेख, अयान शेख, साकिब सय्यद, अयान शेख, इजान शेख, हमजा शेख या खेळाडूंना पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात गौस शेख म्हणाले की, कराटे खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशन योगदान देत आहे. या फेडरेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यात आले आहेत. खेळाडू घडविण्याबरोबर या खेळातील पंच घडविण्याचे कार्य देखील सुरु आहे. या खेळाला ऑलिम्पिकची मान्यता असून, या खेळाच्या माध्यमातून ऑलिम्पिक खेळाडू घडविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सहा. पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख म्हणाले की, कराटे खेळातून युवकांचे शरीर व मन सदृढ होणार आहे. मानसिक व शारिरीक स्वास्थ्याचे प्रश्न युवकांमध्ये उद्भवत असून, मैदानी खेळातून निर्माण झालेला व्यक्ती जीवनातील सर्व संकटांना सामोरे जाऊन यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले. तर शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनने चालवलेल्या क्रीडा चळवळीचे त्यांनी कौतुक केले. स्थायी समितीचे सदस्य सुनिल त्र्यंबके यांनी कराटे पंच परीक्षेत यश संपादन करणार्या युवकांना शुभेच्छा दिल्या.
