• Fri. Jan 30th, 2026

बुर्‍हाणनगरच्या बाणेश्‍वर विद्यालयात शिवजंतीला फडकली महाकाय शिवप्रतिमा

ByMirror

Feb 20, 2023

शाळेच्या तीन मजली इमारतीवरुन फडकविलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी

समाजातील खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनात शिवाजी महाराजांनी स्वाभिमान जागे केले -माजी मंत्री शिवाजी कर्डिले

अहमदनगर (प्रतिनिधी)- बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील श्री बाणेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या तीन मजली इमारतीवरुन 40 फुट उंच व 70 फुट रुंदीचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला महाकाय फलक फडकविण्यात आला. महाराजांना अभिवादन करीत उपस्थितांनी महाकाय फलकावर पुष्पवृष्टी केली.


युवा नेते तथा बाणेश्‍वर शिक्षण संस्थेचे संचालक पै. अक्षय कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिवजयंती उत्सवात शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या. ढोल-ताशांच्या निनादात यावेळी लेझीमचा डाव रंगला होता. समूहगीते, पोवाडे व भाषणातून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वाजल्य शौर्याचा इतिहास डोळ्यासमोर उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ व मावळ्यांच्या वेषभुषेत कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. जय भवानी… जय शिवाजी च्या गजरात पारंपारिक पध्दतीने रंगलेल्या या जयंती सोहळ्यास बाणेश्‍वर संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती.


शिवाजी कर्डिले म्हणाले की, हदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योध्दा आणि सर्वसमावेशक राजा म्हणून कार्य केले. शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य निर्माण केले नाही, तर समाजातील खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनात स्वाभिमान जागे करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. त्यांचे विचार व कार्य सर्व समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. तर सर्व ग्रामस्थांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


युवा नेते अक्षय कर्डिले यांनी शिवाजी महाराजांचा पराक्रम व आदर्शाला मानाचा मुजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची महाकाय प्रतिमा फडकवून पुष्पवृष्टी करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच रावसाहेब कर्डिले, कापूरवाडीचे सरपंच सचिन दुसुंगे, वारूळवाडी सरपंच सागर कर्डिले, उपसरपंच जालिंदर जाधव, वारूळवाडी उपसरपंच नितीन साठे, संस्थेचे रजिस्टर बोर्डे सर, प्राचार्य हापसे सर, जाधव सर, सोसायटीचे माजी चेअरमन रंगनाथ कर्डिले, चेअरमन रंभाजी कर्डिले, दत्ता तापकिरे, दगडू पानसरे आदी उपस्थित होते. जयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी बाणेश्‍वर विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *