• Fri. Jan 30th, 2026

माळीवाडा येथे फुले ब्रिगेडच्या वतीने शिवसन्मान सोहळा साजरा

ByMirror

Feb 18, 2023

शिवजयंतीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास महात्मा फुले यांनी जगासमोर आणला -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कुळवाडी भूषण पोवाड्याच्या माध्यमातून तसेच पहिली शिवजयंती उत्सव साजरा करून त्यांचा इतिहास जगासमोर आणण्याचे काम केले आहे. खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मना-मनात रुजण्याचे काम झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास नेहमीच समाजाला प्रेरणादायी राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर इतिहास, परंपरा व संस्कृतीचा वारसा प्रत्येकाने जोपासून पारंपारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे त्यांनी आवाहन केले.


छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे पार पडला. महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, पंडित खरपुडे, अशोक कानडे, बजरंग भूतकर, नन्नावरे पाटील, रेणुकाताई पुंड, किरण जावळे, महेश गाडे, संतोष हजारे, वैभव मुनोत, महेश सुडके, आकाश डागवले, आशिष भगत, गणेश शेलार, प्रसाद बनकर, भरत गारुडकर, गणेश बोरुडे, अशोकराव तुपे, किरण मेहेत्रे, यश लीगडे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दीपक खेडकर म्हणाले की, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरु माणून त्यांचे कार्य पुढे नेले.

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पहिला कुळवाडी भूषण एक हजार ओळींचा पोवाडा सादर करुन त्यांचे महान कार्य जगासमोर ठेवले. आजही समाजात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचाराने समाजातील वंचित घटकांसाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *