• Fri. Jan 30th, 2026

भिंगारला रंगला खुल्या विभागीय स्केटिंग स्पर्धेचा थरार

ByMirror

Feb 14, 2023

विविध जिल्ह्यातील तीनशेपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग

वार्‍याच्या गतीने स्केटिंगद्वारे धावणार्‍या खेळाडूंनी दाखवली कसब

अहमदनगर (प्रतिनिधी)- टीम ऐम स्पोर्टस अ‍ॅकेडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या विभागीय स्केटिंग स्पर्धेला विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत वार्‍याच्या गतीने स्केटिंगद्वारे धावणार्‍या खेळाडूंनी आपली कसब दाखवून उपस्थितांची मने जिंकली. तर रंगलेल्या अत्यंत अटातटीची ही स्पर्धा पहाण्यासाठी पालकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.


भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या स्केटिंग ट्रॅकवर झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रियदर्शनी स्कूलचे संस्थापक बाळासाहेब खोमणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ शेख, जिल्हा प्रशिक्षक सतीश गायकवाड, टीम ऐमचे अध्यक्ष प्रमोद डोंगरे, सचिव शुभम करपे, गोरक्षनाथ धात्रक, मोरकर सर, औरंगाबाद स्केटिंग संघटनेचे सचिव अजय भटकर, जयराम ढाकणे आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बाळासाहेब खोमणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या खेळात न गुंतता मैदानी खेळात उतरावे. खेळामध्ये करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या असून, खेळाने मन व शरीर स्वास्थ्य निरोगी राहते. आवड असलेल्या खेळात स्वत:ला झोकून दिल्यास त्यामध्ये यश निश्‍चित मिळत असते, तर आलेले अपयश हे स्फुर्ती देणारे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.


या स्पर्धेत पाथर्डी, पारनेर, श्रीरामपूर आदी जिल्ह्यातील व औरंगाबाद, नाशिक, जालना आदी विविध जिल्ह्यातील तब्बल तीनशेपेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या विभागीय स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे संघ व खेळाडूंना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसाने गौरविण्यात आले. संध्याकाळ पर्यंत स्पर्धा चालू होत्या. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना मेडल व बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *