• Fri. Sep 19th, 2025

मतदानाचा अधिकार संविधानिक असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

ByMirror

Feb 5, 2023

मतदानापूर्वी मतदारांना संविधानिक शपथ देण्याची तरतुद करण्याची इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेची मागणी

मतदारांमध्ये उन्नत चेतना वाढविण्यासाठी व त्यांना राष्ट्रीय कर्तव्याला जागविण्यासाठीचा प्रयत्न -अ‍ॅड. गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना दिलेला अधिकार हा संविधानिक अधिकार असल्याचे जाहीर केल्याच्या निर्णयाचे इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेच्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे. तर मतदारांमध्ये उन्नत चेतना वाढविण्यासाठी व त्यांना राष्ट्रीय कर्तव्याला जागविण्यासाठी मतदानापूर्वी मतदारांना संविधानिक शपथ देण्यासाठी तरतुद करण्याची मागणी संघटनेच्या वतीने निवडणुक आयोगाकडे करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.


भारतातील मतदारांना मतदानाचा अधिकार कायद्याने मिळाला आहे. अशा प्रकारचे प्रतिपादन भारताचे निवडणूक आयोगाने सुरू ठेवले. परंतु भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचुड आणि न्यायमूर्ती के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने मतदारांना दिलेला अधिकार हा संविधानिक अधिकार असल्याचे जाहीर केल्यामुळे देशातील तमाम मतदारांमध्ये चैतन्याची लाट निर्माण झाली आहे. देशातील 18 वर्षावरील सर्व मतदार संविधान मतदार म्हणून घोषित झाले आहे. यासाठी संघटनेने जय शिवाजी, जय संविधान मतदार व जय डिच्चू कावा ही घोषणा जारी केली आहे.


नुकत्याच पदवीधर विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना 22 हजार रुपये पर्यंत प्रत्येकी लाच दिल्याच्या बातम्या आहेत. एकंदरीत या देशात पैशाने मत खरेदी करण्यासाठी अनेक लोक कर्कासूर रांगेत उभे आहेत. ही बाब सिद्ध झाली आहे. निरंतर राष्ट्रीय कर्तव्य टाळणार्‍या मतदारांना तमस ढबू मकात्या मतदार म्हणून ओळखण्याची गरज आहे. परंतु ही परिस्थितीत युद्ध पातळीवर बदलण्याची गरज आहे. यासाठी देशातील सर्व मतदार संविधानाने घोषित केलेले मतदार ठरल्यामुळे मतदारांची उन्नत चेतना वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी राष्ट्रीय कर्तव्याला जागण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकसभा, विधानसभा आदी निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी निवडणूक केंद्रात प्रवेश घेतल्याबरोबर त्याच्या बोटावर शाही लावताना त्याने भारतीय संविधानावर हात ठेऊन कोणत्याही आमिषा शिवाय आणि भीती शिवाय माझे अंतकरणाला भावलेल्या उमेदवाराला मत देत असल्याची शपथ घेतली पाहिजे. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर संविधानिक शपथ देण्यासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र अधिकार्‍यांची भारतीय निवडणूक आयोगाने तरतूद करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.


भ्रष्टाचाराच्या मार्गाने मतं खरेदी करणार्‍या व्होट माफीयांना जय शिवाजी, जय डिच्चूकावा तंत्राने डब्यात टाकण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. मतदारांना दारू, कोंबडी, पैसे किंवा जातीचे नाव दाखवून मत खरेदी करणार्‍या व्होट माफीयांचा कायमचा बिमोड करण्यासाठी मतदारांना संविधानिक शपथ घेण्याची तरतूद भारताच्या निवडणूक आयोगाने करावी यासाठी संघटनेचे कार्यकर्ते दिल्ली येथे निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष रीतीने भेटून मागणी करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. महेबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *