पद्मशाली समाजाने केला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका दत्तात्रय तडका हिचा पद्मशाली समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. बत्तीन, बिज्जा, कोडम, भैरी, तडका, महेसूनी परिवाराच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश्वरी तडका, मुकुंद तडका, रवी कोडम, दत्तू बिज्जा, तृप्ती कोंडा, गीता महेसुनी आदींसह परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुकुंद तडका म्हणाले की, पारंपरिक, विणकाम, विडी उद्योगात असलेल्या पद्मशाली समाजातील युवक-युवती सर्वच क्षेत्रात आपल्या यशाचा झेंडा रोवत आहे. वडिलांनी मनात पेरलेले सीए होण्याचे स्वप्न श्रुतिकाने आपल्या जिद्द, परिश्रम आणि मेहनतीने पूर्ण केले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सीए होण्याचा बहुमान पटकाविणारी ती पद्मशाली समाजाचा अभिमान आहे.
श्रुतिका तडका म्हणाली की, अकरावीत शिकत असताना वडील सोडून गेले. त्यानंतर शिक्षण खडतर परिस्थितीमध्ये झाले. अशा परिस्थितीमध्ये आईने आधार देण्याचे काम केले. सीए होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून मेहनत घेतली. आईची प्रेरणा व वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आले.
या यशात काका मुकुंद तडका यांनी देखील मोलाची साथ दिली असल्याचे तिने सांगितले. तर उपस्थित महिलांनी श्रुतिकाने समाजातील तरुणींसमोर एक आदर्श उभा केला असल्याची भावना व्यक्त केली.