पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा प्रहारच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात दिव्यांगाच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी पुढाकार घेणार्या नगर तालुका पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांचा प्रहार दिव्यांग क्रांती नगर तालुक्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर दिव्यांग मंत्रालय घोषित झाल्यामुळे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचा आनंद पेढे वाटून साजरा करण्यात आला.
दिव्यांगांचे अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावले जात असल्याने संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यास सहकार्य करणारे ग्रामसेवक यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांतीचे पोपटराव शेळके, राजेंद्र पोकळे, संदेश रपारिया, नगर तालुका अध्यक्ष किशोर सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांचे शासन स्तरावर अनेक वर्षापासून विविध कामे प्रलंबीत होती. दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून ही प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना प्रहार दिव्यांग क्रांतीच्या पदाधिकार्यांनी व्यक्त करुन, सरकारी अधिकार्यांचे दिव्यांगांच्या प्रश्नासाठी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.