• Fri. Mar 14th, 2025

महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या मेळाव्यात ज्ञानदेव अकोलकर यांच्या सेवापूर्तीचा गौरव

ByMirror

Jan 1, 2023

एस.टी. कामगारांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा

चुकीच्या नेतृत्वाने केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे व कामगारांचे नुकसान झाले -संदीप शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी कामगारांच्या प्रश्‍नावर चुकीच्या नेतृत्वाने केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे व कामगारांचे मोठे नुकसान झाले. ते कदापी लवकर भरून निघणारे नाही. कर्मचार्‍यांना राज्य शासनाएवढे पगार देण्यास महामंडळ कटिबद्ध आहे. सातवा वेतन आयोगाचा दावा अंतिम टप्प्यात असून, सेवाजेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केले. तर ज्ञानदेव अकोलकर यांच्या संघर्षशील नेतृत्वामुळे संघटनेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील एस.टी. कामगारांना न्याय देता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचा (मुंबई) जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. शहरातील अक्षता हॉल येथे झालेल्या मेळाव्यात एस.टी. महामंडळात 36 वर्षे सेवा करणारे (पाथर्डी आगार) व संघटनेचे प्रादेशिक सचिव ज्ञानदेव गणपत अकोलकर यांचा सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सपत्निक मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार मोनिकाताई राजळे, आमदार निलेश लंके, संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताटे, विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस, कार्याध्यक्ष रोहिदास अडसुळ, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड, गणपत अकोलकर, सौ. आशा ज्ञानदेव अकोलकर, शिवसेनेचे दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, मार्केट कमिटीचे माजी सभापती विलास शिंदे, बीडचे अशोक गावडे, जळगावचे विनोद शितोळे, धुळ्याचे संतोष वाडीले, पांडव, पुणे येथील सुपलकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबा तरटे, नगरसेवक निखिल वारे, डॉ. सागर बोरुडे, मार्केट कमिटीचे संचालक तथा हातवळण गावचे सरपंच बाळासाहेब मेटे, करंजी गावचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती मिर्झा मणियार, शिक्षक बँकेचे माजी संचालक विजय अकोलकर, जामगावच्या सरपंच अरुणाताई खाडे, बलभिम कासार, एन.डी. कासार, अन्सार शेख, डेपो सचिव दिलीप लबडे, संजीव गाडे, प्रविण ढगे, सचिन मासाळ, अरुण दळवी, संजय नलगे, इम्रान खान, लोखंडे, अशोक पुजारी, भाऊसाहेब कोतकर, पाठक, राजेंद्र शेळके, बलभिम कुबडे, बाळासाहेब सोनटक्के, कॉ. संजय नांगरे आदींसह जिल्ह्यातील एस.टी. कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे शिंदे म्हणाले की, न्याय, हक्काच्या मागण्यासाठी संघर्ष केंव्हा व कसा करावा? याचे देखील भान असले पाहिजे. टोकाची भूमिका घेताना कामगारांची जाणीव ठेवली पाहिजे. नेतृत्व चुकले तर संघटना भरकटते. अकोलकर जिल्ह्यातील संघर्षमय नेतृत्व राहिले. त्यांनी शेवट पर्यंत कामगारांच्या हितासाठी संघर्ष केला. संघटनेने अशा लढवय्या नेतृत्वाला सलाम करत सेवापूर्तीचा सन्मान केला असल्याचे सांगितले.


आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, संघर्ष व समन्वयाची भूमिकेतून नेतृत्व उदयास येत असते. अकोलकर यांनी नेहमीच एस.टी. कामगारांचे राज्य सरकारकडे प्रश्‍न मांडले. कामगार व सरकार यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी काम केले. विविध प्रश्‍नांवर संघर्ष करून त्यांचे प्रश्‍न सोडविले. संघर्षशील नेतृत्व निवृत्त होत नाही, ते सदैव समाजात कार्यरत असतात असे त्यांनी सांगितले.


सत्काराला उत्तर देताना ज्ञानदेव अकोलकर म्हणाले की, एस.टी. महामंडळात 36 वर्षे सेवा केली. संघटनेचे नेतृत्व करत असताना कामगारांच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष केला. या संघर्षातून बेकायदेशीररित्या बडतर्फ करण्याची नोटीस बजावली गेली. सेवापूर्तीचा कार्यक्रम होणार की नाही? याची शाश्‍वती नव्हती. कामगारांच्या प्रश्‍नावर अधिकारी आंदोलनाशिवाय ऐकण्यास तयार नव्हते. आंदोलन करुन अनेक प्रश्‍न मार्गी लावल्याचे समाधान आहे. संघटना व न्यायदेवतेच्या बळावर आज सेवापूर्ती होत आहे. यापुढे नवीन सहकार्‍यांनी संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन संघटना पुढे घेऊन जाण्याचे त्यांनी आवाहन केले.


यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अकोलकर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील एस.टी. कामगारांशी संवाद साधून त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले व त्यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिवाजी कडूस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम रणसिंग यांनी केले. आभार रोहिदास अडसुळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *