विविध प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप
आरोपींवर गुन्हे दाखल व्हावे व दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध प्रकरणांमध्ये वेळोवेळी पत्र व्यवहार व पाठपुरावा करुन देखील स्थानिक पातळीवरील पोलीस स्टेशनद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही व दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींवर कारवाई होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि.19 डिसेंबर) पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
या उपोषणात जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे, साहेबराव होळकर, संतोष होळकर, विजय रोडे, नामदेव भांड, एकनाथ लोंढे, निर्मला लोंढे, व्हिक्टोरिया फर्नांडिस आदी सहभागी झाले होते.
पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 4 एप्रिल रोजी दाखल झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी राजरोसपणे फिरत असून त्याला अटक होत नाही. माजी सरपंच महिलेने खोटी बनावट तक्रार करून सोशल मीडियाद्वारे व्हायरल करुन बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. माहिती अधिकारातील माहिती अपहरणातील असल्याने जाणीवपूर्वक समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांनी न देता, काही दिशाभूल करणारी माहिती दिल्याने त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरातील बनावट दारू व विक्रीत अनियमित असल्याने त्यांचे परवाने रद्द करुन गुन्हे दाखल करणे, पारनेर तालुक्यातील त्या कॉलेजची माहिती जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी जाणीवपूर्वक दडपत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, अहमदनगर शहरातील व्हिक्टोरिया फर्नांडिस महिला या महिलेस एका डॉक्टरने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, नेवासा तालुक्यातील मौजे धनगरवाडी येथील साहेबराव होळकर यांना अनेक वर्षापासून त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देणार्या गुंडावर कारवाई व्हावी, नवनागापूर येथील बांधकाम व्यावसायिकाने बँकेशी संगणमत करून अनेक व्यक्तींची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले.
या उपोषणाची अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दखल घेऊन, या प्रकरणातील संबंधित पोलीस स्टेशनला याबाबत शहानिशा करुन कारवाई करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे.
