जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्या समाजाला महात्मा फुलेंनी दिशा दिली -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, कार्याध्यक्ष वसंतराव थोरात, शाम गोडळकर, राजीव साळवे, दत्ता रणसिंग, सुदाम जाधव, नागरदेवळेचे माजी सरपंच बापूसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे म्हणाले की, जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दीन-दुबळ्या समाजाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिशा दिली. त्याग, आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. समाजसेवेला आपले पूर्ण जीवन वाहून घेतलेले दाम्पत्य म्हणून फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील. तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून बहुजन समाजाला बाहेर काढण्यासाठी तसेच स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देण्याचे महान कार्य त्यांनी केले. स्त्री शिक्षणाबद्दल शब्दही काढणे पाप मानले जात असताना त्या काळात त्यांनी सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्रियांसाठी शाळा काढली. स्वताला होणार्या त्रासापेक्षा ह्या दाम्पत्याला स्त्रिया व शुद्र ह्यांच्या जीवनात परिवर्तन घडविल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी समाजात विषमता आणि रुढी, परंपरा दूर होण्यासाठी महात्मा फुले यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. शिक्षणाने बहुजन समाजाला जागरुक करण्याचे काम त्यांनी केले. महिलांना सुशिक्षित करुन त्यांनी समाजाला दिशा देण्याचा दृष्टीकोन साध्य केला. त्यांचे कार्य व विचार समाजाला प्रेरणा व ऊर्जा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
