मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा लेट कुलसुमबी फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे प्रमुख कार्यवाह कुतबुद्दीन शेख, जिल्हा माहिती कार्यालयाचे माजी माहिती सहाय्यक फकिरमोहंमद पठाण, निसार मास्टर आदी उपस्थित होते.
कुतबुद्दीन शेख म्हणाले की, पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी कार्य करणारी मराठी पत्रकार परिषद राज्यव्यापी संघटना आहे. या संघटनेच्या राज्याच्या कमिटीवर सरचिटणीसपदी मन्सूर शेख यांना काम करण्याची मिळालेली संधी जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.
फकिरमोहंमद पठाण यांनी जिल्ह्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर मन्सूरभाई शेख सातत्याने काम करत आहे. सामाजिक उपक्रमाने त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. मनमिळावू स्वभावाने त्यांनी चांगल्या प्रकारे पत्रकारांचे संघटन केले असून, पत्रकार आणि समाजातील इतर घटकांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असल्याचे त्यांनी सांगितले.
