सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार केतकर यांनी केला सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (19 नोव्हेंबर) ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडला झाले. मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी नगरचे पत्रकार मन्सूर शेख यांची निवड झाली असता या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार केतकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करुन सत्कार करण्यात आला.
या अधिवेशनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, अध्यक्ष शरद पाबळे, विश्वस्त किरण नाईक, उपाध्यक्ष शरद काटकर, किरण नाईक, मिलिंद अष्टीवकर, हरीश पाटणे आदींसह परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मन्सूरभाई शेख गेली पंचवीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून ते मराठी पत्रकार परिषद, मुंबई या संघटनेशी जोडलेले आहे. काही वर्षापासून ते नाशिक विभागीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते. पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी परिषदेच्या वतीने केले जाणार्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. इतरही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कमिटीवर सरचिटणीसपदाच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.