• Wed. Oct 29th, 2025

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात

ByMirror

Nov 16, 2022

बास्केटबॉल स्पर्धेचा थराराने रंगले चुरशीचे सामने

जीवनातील प्रत्येक क्षण ही स्पर्धा -इंजि. केतन क्षीरसागर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी 16 वर्षा खालील मुला-मुलींची जिल्हा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. अहमदनगर डिस्ट्रिक्ट अ‍ॅम्युचर हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या निवडचाचणीत बास्केटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता. जिल्ह्यातील बास्केटबॉल संघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले. यावेळी अत्यंत चुरशीचे सामने रंगले होते. या स्पर्धेतून धुळे येथे होणार्‍या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे.


बास्केटबॉल जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष पियुष लुंकड, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, सहसचिव चंद्रशेखर म्हस्के, खजिनदार सत्येन देवळालीकर, सचिव मुकुंद काशिद, ओमसिंग बायस, मुजफ्फर शेख आदींसह खेळाडू उपस्थित होते.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, जीवनातील प्रत्येक क्षण ही स्पर्धा असून, त्या स्पर्धेला खेळाडूवृत्तीने सामोरे जाण्याची गरज आहे. शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. खेळाने विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होऊन खेळाडूवृत्ती निर्माण होते. जय-पराजय या गोष्टीपेक्षा स्पर्धेत उतरुन लढा देणे हा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही खेळातील खेळाडू हा जीवनात अपयशाने खचून न जाता, नव्या उमीदीने उभा राहत असल्याचे सांगून खेळाडूंना जिद्द, चिकाटी व संयमाने यशोशिखर गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्रास्ताविकात मुजफ्फर शेख यांनी बास्केटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट अ‍ॅम्युचर हौशी बास्केटबॉल असोसिएशन राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सहसचिव चंद्रशेखर म्हस्के यांनी पाहुण्यांचे व खेळाडूंचे स्वागत केले. अध्यक्ष पियुष लुंकड यांनी स्पर्धेची माहिती देऊन शारीरिक तंदुरुस्तीसाठी हा खेळ उपयुक्त असल्याचे सांगितले. खजिनदार सत्येन देवळालीकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *