मानवरुपी ईश्वरसेवा आयुष्यात समाधान देणारी -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कोविड सेंटर चालविल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष म्हस्के यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी सत्कार केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, शिराढोणचे सरपंच दादासाहेब दरेकर, मठपिंपरीचे सरपंच अंकुश नवसुपे, विशाल बोरकर, पाथर्डी तालुका मुख्याध्यापक संघाचे खजिनदार बाळासाहेब खेडकर, कलाध्यापक संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष आत्माराम दहिफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, शहरातील सर्व हॉस्पिटल व कोविड सेंटर हाऊसफुल झाले असताना, ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी संतोष म्हस्के यांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर उभे केले. या कोविड सेंटरद्वारे हजारो रुग्ण बरे होऊन घरी परतले. निस्वार्थ भावनेने त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असून, मानवरुपी ईश्वरसेवा आयुष्यात समाधान देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सभापती अभिलाष पाटील घिगे यांनी बाजार समितीच्या माध्यमातून संकट काळात शेतकरी वर्गाला आधार देऊन कोविड सेंटरच्या माध्यमातून सेवा करण्यात आली असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना संतोष म्हस्के म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यास बळ मिळाले. सर्वसामान्य ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी कोविड सेंटरकडे नेहमी आशेने पाहत होते. अनेकांचे जीव वाचविल्याचे समाधान असून, ही सामाजिक कार्य पुढे अविरतपणे सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.