• Fri. Jan 30th, 2026

महिलांविषयी बेताल वक्तव्य करणार्‍या मंत्र्यांसाठी नगरमधून बांगड्यांचा आहेर

ByMirror

Nov 10, 2022

सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष ढवळे यांनी नोंदविला निषेध

शिवाजी महाराजांच्या आदर्शाने नव्हे तर सुर्याजी पिसाळ यांच्या आदर्शाने सरकारचे कारभार -बाळासाहेब ढवळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे व शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोलणार्‍या राज्य सरकारमधील मंत्र्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पोस्टाने बांगड्यांचे आहेर पाठवले. तर सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने नव्हे तर सुर्याजी पिसाळ यांच्या आदर्श ठेऊन कारभार करत असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे.


राज्य सरकारमधील कृषी मंत्री व पाण पुरवठा मंत्री यांनी महिलांविषयी बेताल वक्तव्य करुन महिलांचा अवमान केला आहे. तर महसूल मंत्री यांनी मयत शेतकर्‍याच्या घरी जाऊन मिठाई दिली. हा प्रकार निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रियांना मनाचे स्थान होते. त्यांच्या नावाने राजकारण करणार्‍या सत्ताधारी सरकारचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर बेताल वक्तव्य केले. तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीगोंदा तालुक्यातील कणसेवाडी येथे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या गणेश इंगळे या शेतकर्‍याच्या घरी जाऊन मिठाई भेट दिली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत न करता, शासकीय आश्‍वासन देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम त्यांनी केले असल्याचा आरोप ढवळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जात होता. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्यात सुद्धा स्त्रियांचा सन्मान केला जात होता. मात्र शिंदे गटाने स्थापन केलेली शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर नसून, ही सूर्याची पिसाळ यांची सेना असल्याचे ढवळे यांनी म्हंटले आहे. इथून पुढल्या काळामध्ये स्त्रियांवर आक्षेपार्ह वक्तव्य व अन्याय सहन केले जाणार नसून, या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांनी निषेध नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *