कोरोना काळातील लंगर सेवेच्या कार्याची थेट डेन्मार्क मधून दखल
दोन वर्ष लाखो भुकेल्यांना निशुल्क जेवण पुरविलेल्या कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- जगात जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्यांना डब्ल्यू,ए.एफ.ए. संस्था कोपनहेगन, डेन्मार्क येथून आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी कोरोना काळात गरजू घटकांना दोन वेळचे जेवण पुरविणार्या गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेचे कार्य पुरस्कार्थींच्या अंतिम यादीत पोहचले असल्याची माहिती डेन्मार्क येथून नुरुदीन अहमद यांनी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा यांना कळवली आहे.

डेन्मार्क येथून मागील अकरा वर्षापासून जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक योगदान देणार्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरु झालेल्या लंगर सेवेने तब्बल दोन वर्ष लाखो भुकेल्यांना दोन वेळचे निशुल्क जेवण पुरविण्याचे कार्य केले. आजही लंगर सेवेची अन्न छत्रालय सुरु आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराच्या निवड समितीने लंगर सेवेला अन्न श्रेणीत अंतिम 14 पुरस्कार्थीं पर्यंत निवड केली आहे.
कोरोना काळात लंगर सेवेच्या कार्य व योगदानाने डब्ल्यू,ए.एफ.ए. प्रभावित झाली असून, हे कार्य इतरांसाठी आशेचा संदेश असल्याचे नुरुदीन अहमद यांनी कळविले आहे. लंगर सेवेच्या प्रतिनिधींना ऑनलाइन पुरस्कार समारंभात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी अंतिम पुरस्कार्थीची घोषणा केली जाणार आहे.

जलधी पुजारा यांनी आपल्या शहरातील लंगर सेवेचे सामाजिक कार्य डब्ल्यू,ए.एफ.ए. संस्थेला फेब्रुवारी 2022 मध्ये पाठविले. यासाठी रितू विशंबरलाल अॅबट यांनी विशेष सहकार्य केले. घर घर लंगर सेवेच्या सेवादार मध्ये पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, प्रितपालसिंह धुप्पड, जनक आहुजा, प्रशांत मुनोत, सनी वधवा, किशोर मूनोत, राजेंद्र कंत्रोड, राहुल बजाज, जय रंगलानी, सतीश गंभीर, करण धुप्पर, राजा नारंग, सुनील थोरात, मंनित भल्ला, अंकित भुटानी, अनिश आहुजा, विकी मेहरा, गोविंद खुराणा, मन्नू कुकरेजा, प्रमोद पंतम, संदेश रपारिया, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, जस्मीत वधवा, दामोदर माखीजा, सिमर वधवा, दलजीत वधवा, बलजीतसिंह बिलरा, गुलशन कंत्रोड, राजू जग्गी, धनंजय भंडारे, अभिमन्यू नय्यर, पुनीत भुटाणी, अजय पंजाबी, टोनी कुकरेजा, रोहित टेक्वानी, राजेश कुकरेजा, संजय असनानी, कबीर धुप्पर, मनोज मदान, अर्जुन मदान, जतिन आहुजा, नारायण अरोरा, राहुल शर्मा, कैलाश नवलानी, कैलास ललवाणी, सुनील छाजेड, विपूल शाह, भरत तलरेजा, ईश्वर बोरा, सुनील मेहतानी, सागर मेहसोनी, दिनेश भातीया, राजवंश धुप्पड, हरमनकौर वधवा आदींसह लायन्स क्लबचे सदस्य सहभागी आहे.