महालेखापाल स्तरावरुन दप्तर तपासणी व्हावी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यांच्या खर्चाबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा आरोप करुन महालेखापाल मुबई स्तरावरुन चौकशी समितीद्वारे याबाबत चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल व मुख्य लेखापाल यांना निवेदन पाठविले आहे. सदर प्रकरणी अनेकवेळा पाठपुरावा करुन देखील कारवाई होत नसल्याने सहकार आयुक्त कार्यालय पुणे येथे उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या सर्व योजनांच्या खर्चाबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी. सदर चौकशी ही जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या कर्मचारी, अधिकारी यांच्या स्तरावरून न करता महालेखापाल मुंबई स्तरावरून चौकशी समिती गठित करून चौकशी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणातील दोषी जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अहमदनगर लेखाधिकारी स्वच्छ भारत मिशन व उपमुख्यकार्यकारी पाणी व स्वच्छता यांच्या संगनमताने हा अपहार झाला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. चौकशीत दप्तर तपासणी (1 जून 2018 ते 31 मे 2021 पर्यंत) केल्यास सर्व अपहार निष्पन्न होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.