• Sat. Mar 15th, 2025

भिंगार येथील नगर-पाथर्डी महामार्गावर अपघाता कारणीभूत ठरणारे भाजी-फळ विक्रेते हटवा

ByMirror

Sep 24, 2022

तर वाहतुक कोंडीच्या त्रासाने स्थानिक नागरिक त्रस्त

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील नगर-पाथर्डी महामार्गावर अनधिकृतपणे बसणार्‍या भाजी-फळ विक्रेत्यांमुळे वाहतुक कोंडी निर्माण होऊन वारंवार लहान-मोठे अपघात घडत असताना त्यांना त्वरीत हटवून दिलेल्या पर्यायी जागेत स्थलांतर करण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पो.नि. शिशीरकुमार देशमुख यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव विक्रम चव्हाण, सल्लागार प्रशांत पाटोळे, शैलेश घावरी, दीपक नकवाल, धीरज बैद, संजय खरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पो.नि. देशमुख यांनी रस्त्यावरील भाजी-फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण कॅन्टोमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलून हटविण्याचे आश्‍वासन दिले.


भिंगार शहरामध्ये नगर-पाथर्डी महामार्गावर पंचशील वेशीपासून ते प्रकाश हॉटेल पर्यंन्त भाजी-फळ विक्रेते अनाधिकृतपणे रस्त्यावर बसत आहे. दिवसंदिवस त्यांची संख्या वाढत असून, यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालत असून, भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक रस्त्यावर येत असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. कॅन्टोमेंटने त्यांना बसण्यासाठी जागा देऊन देखील भाजी-फळ विक्रेते रस्त्यावर बसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


मागील दोन वर्षात सततच्या अपघातामुळे नागरिकांचे व भाजी विक्रेत्यांचे जीव देखील गेले आहे. रोड लगत असलेल्या छावणी परिषद शाळा, भिंगार हायस्कूल, रयत शिक्षण संस्था, प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांना देखील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांमुळे होणार्‍या वाहतुक कोंडीचा त्रास होत असून, विद्यार्थ्यांना जीव मुठित धरुन शाळेत जावे लागत आहे. नवरात्र उत्सवात अनेक महिला व भक्त देवीच्या दर्शनासाठी पायी जात असतात. अशा परिस्थितीमध्ये अपघात घडण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. त्वरीत नगर-पाथर्डी महामार्गावर अनधिकृतपणे बसणार्‍या भाजी-फळ विक्रेत्यांना हटवून दिलेल्या पर्यायी जागेत त्यांचे स्थलांतर करण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *