मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वतीने घटनेचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- अॅग्लो उर्दू हायस्कूल जामखेड येथील मुख्याध्यापकास शाळेत मारहाण करणार्या संबंधित संस्था पदाधिकारीवर कारवाई करुन अटक करण्याची मागणी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली.
या घटनेचा जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तसेच आमदार निलेश लंके यांना देखील या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील पंडित, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, बी.एस. बिडवे, महेंद्र हिंगे, श्रीकृष्ण पवार, बद्रीनाथ शिंदे, फजल अहमद, शहेनाज सय्यद, शेख युनूस, तरन्नुम शेख, सतीश सातपुते, संजय कानडे आदी उपस्थित होते.
अंजुमन तरकीय तालिम या संस्थेची शाळा अॅग्लो उर्दू हायस्कूल खर्डा (ता. जामखेड) येथे असून, या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून युनूस अकबर शेख कार्यरत आहेत. ते मागील 28 वर्षापासून शाळेत सेवा देत आहे. 22 ऑगस्ट 2022 पासून ते वैद्यकिय कारणासाठी रजेवर होते. त्यांची तब्येत सुधारल्याने ते शाळेत 12 सप्टेंबर रोजी हजर होण्यास आपल्या पत्नीसह आले होते. ते कार्यकरत असताना शाळेच्या संस्था पदाधिकारी मोहसिन अमजद सय्यद तसेच त्यांच्या पत्नी व त्यांची बहीण यांनी येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबद्दल विचारणा केली असता, मुख्याध्यापक युनूस शेख यांना संबंधितांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. शेख यांच्या पत्नी यांनी मध्यस्थी केली असता, त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली. तर त्यांना दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
संबंधित मुख्याध्यापक व त्यांचे कुटुंबीयांची मानसिक स्थिती खालवली असून, कुटुंबीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्याध्यापकास शाळेत मारहाण करणार्या संबंधित संस्थेच्या पदाधिकार्यावर त्वरीत कारवाई करुन अटक करावी व शेख कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वतीने संघटनेने केली आहे.
