• Wed. Feb 5th, 2025

महात्मा फुले वस्तीगृहातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्न-धान्याचे वाटप

ByMirror

Jul 28, 2022

वंचित घटकांना प्रवाहात सामावून घेण्यासाठी कृतीशील सामाजिक उपक्रमाची आवश्यकता -अ‍ॅड. सुरेश लगड

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांना प्रवाहात सामावून घेण्यासाठी कृतीशील सामाजिक उपक्रमाची आवश्यकता आहे. अशा उपक्रमाद्वारे तळागाळातील गोरगरीब गरजू, दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मदत करून दातृत्वाची संकल्पना जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांनी कृतीतून दर्शवली आहे. मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी जय असोसिएशन संलग्न सामाजिक संस्था जिल्हाभर सामाजिक योगदान देत असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केले.


माळीवाडा येथील महात्मा फुले वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅड. महेश शिंदे यांच्या पुढाकाराने धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सचिन गुलदगड, रयत प्रतिष्ठानचे पोपट बनकर, लवेश गोंधळे, छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, भारती शिंदे, अर्थ सल्लागार विनायक नेवसे, नर्मदाचे अ‍ॅड. सुनील तोडकर, अ‍ॅड. राजेश कावरे, माहेर संस्थेच्या अध्यक्षा रजनी ताठे, शेखर होले, दत्ताभाऊ वामन, डॉ. धीरज ससाणे, संतोष गिर्‍हे, अशोक कासार, प्रीती औटी, जयश्री शिंदे, प्राचार्य सिताराम जाधव, शिवाजी नवले, महात्मा फुले वस्तीगृहाचे अध्यक्ष गणेश कोरडे आदी उपस्थित होते.
ह.भ.प. सुनील महाराज तोडकर यांनी योग्य वयात संस्काराचे बीज रोवल्यास सक्षम युवा पिढीची निर्मिती होणार आहे. आजचा युवक हे आपल्या देशाची खरी ताकद आहे. समाजातील संस्था या सक्षम, सदृढ पिढी घडविण्यासाठी धडाडीने कार्य करीत आहे. समाजातील युवा पिढीने दातृत्वगुण अंगी जोपासण्याचे त्यांनी सांगितले.


अ‍ॅड. महेश शिंदे यांनी आपण समाजाचे देणे लागतो. समाजासाठी काही सकारात्मक कार्य सामाजिक संस्थांनी केले पाहिजे, तरच सामाजिक क्रांती घडेल असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर होले यांनी केले. आभार सचिन गुलदगड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *