शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव;
विद्यार्थ्यांना घडविण्यासह लोकसहभागातून शाळांच्या इमारती उभारण्यात मोलाचे योगदान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करत विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान देणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना परतगंगा व जिद्द फाऊंडेशनच्या वतीने ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, शाळांच्या भौतिक सुविधा विकसित करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करणे आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणे, अशा विविधांगी कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
चाँद हुसेन शेख यांनी शिक्षक म्हणून आपल्या सेवाकाळात अनेक विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य केले आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, गुणवत्ता, सामाजिक जाणीव आणि संस्कार रुजविण्यावर त्यांचा विशेष भर राहिला आहे.
शेख यांनी ज्या-ज्या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्या-त्या ठिकाणी शाळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला.
ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकसहभागातून शाळांच्या इमारती उभारण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. किन्ही (पारनेर), दरेवाडी (नगर), हिवरेझरे (नगर), कनोली (संगमनेर), नाचनगाव (अकोले) आणि नवनागापूर (नगर) येथील शाळांच्या इमारतींची कामे यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात त्यांनी योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने त्यांनी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरले आहेत.
शैक्षणिक कार्याबरोबरच चाँद शेख यांनी सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदविला आहे. समाजातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे ते उत्कृष्ट पोवाडा गायक असून महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाची आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख आपल्या गायनातून करून देतात. पोवाड्याच्या माध्यमातून ऐतिहासिक महापुरुषांचे विचार आणि पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही ते करतात.
त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत परतगंगा व जिद्द फाऊंडेशनने त्यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ जाहीर केला आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

