जळगाव येथे झाला सन्मान; योग आणि ध्यानाच्या माध्यमातून केलेल्या निस्वार्थ कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- योग आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याबरोबरच व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले भिंगार, अहिल्यानगर येथील योगसेवक रामचंद्र बाबुराव लोखंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व योगसेवेबद्दल डॉ. राजेंद्र प्रसाद राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जळगाव येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रामचंद्र लोखंडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या दीर्घकालीन योगसेवेचे आणि सामाजिक योगदानाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
रामचंद्र लोखंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करीत आहेत. केवळ शारीरिक आरोग्य सुधारणे एवढाच मर्यादित उद्देश न ठेवता, मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनशैली विकसित करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, हा संदेश ते आपल्या कार्यातून देत आहेत.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत तरुणाईमध्ये वाढणारे व्यसनाधीनतेचे प्रमाण ही चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर युवक-युवतींमध्ये व्यसनांपासून दूर राहण्याची जाणीव निर्माण करून त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने लोखंडे विविध ठिकाणी योग व ध्यानधारणेची शिबिरे घेतात. वयोवृद्ध, महिला, विद्यार्थी आणि तरुण अशा समाजातील विविध घटकांना ते विनामूल्य योगाचे प्रशिक्षण देतात. योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक शांतता आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, याबाबत ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत अनेकांनी नियमित योगाभ्यासाला सुरुवात केली असून आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल अनुभवले आहेत. त्यांनी केलेल्या या निःस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ. राजेंद्र प्रसाद राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते फारुक शहा यांनी दिली. लोखंडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

