• Wed. Nov 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

दुष्काळाच्या लढ्यात साहित्यिकांनी उतरावे; पशुधन वाचविण्यासाठी सज्ज व्हा!’ -माधवराव लामखडे

ByMirror

Nov 25, 2026
निमगाव वाघा येथे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात

निमगाव वाघा येथे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात


कवितेतून दुष्काळाची दाहकता अन्‌ समाजजागृतीचा जागर!; दुष्काळावरील काव्यलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सध्याची दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत असून, अशा संकटाच्या काळात साहित्यिक आणि कवींनी समाजजागृतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्‍यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून दुष्काळाच्या लढ्यात योगदान द्यावे. पशुधन जगले पाहिजे, यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज भासणार आहे. आगामी दोन महिन्यांनंतर दुष्काळाची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवणार असून, वन्यप्राणी आणि जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी आतापासूनच सज्ज राहावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी माधवराव लामखडे बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष ॲड. राजेश कावरे, कवी संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. अश्‍विनी काळे (पुणे), कार्यक्रमाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, वक्ते अमोद नलगे, साहित्यिक व कवयित्री सरोज आल्हाट, भागवताचार्य रत्नप्रभा काळे, ह.भ.प. दिपाली गणगे (कोकाटे), माजी सरपंच साहेबराव बोडखे, भाऊसाहेब ठाणगे, लक्ष्मण चौरे, काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष भरत बोडखे यांच्यासह साहित्यिक, कवी, शाहीर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लामखडे पुढे म्हणाले की, दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर आयोजित करण्यात आलेली काव्यलेखन स्पर्धा कौतुकास्पद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या कविता आणि साहित्य समाजामध्ये जागृती घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतील. दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देणे आवश्‍यक आहे. विशेषतः पशुधन आणि वन्यप्राण्यांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होण्यापूर्वीच त्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


स्वागताध्यक्ष ॲड. राजेश कावरे म्हणाले की, साहित्य हे समाजाचा आरसा आहे. समाजातील वेदना, आनंद, संघर्ष, परिवर्तन, संस्कार आणि माणुसकीचे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटत असते. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची आवश्‍यकता आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


कवी संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. अश्‍विनी काळे म्हणाल्या की, डिजिटल युगात मोबाईल, ई-पुस्तके, विविध डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वाचन संस्कृती बहरली पाहिजे. साहित्य आणि काव्य ही केवळ मनोरंजनाची साधने नसून समाजाला दिशा देणारे विचार आहेत. त्यामुळे नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी साहित्यिकांची मोठी जबाबदारी आहे. बदलत्या काळानुसार वाचनाची माध्यमे बदलत असली तरी वाचनाचे महत्त्व कायम राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.


संमेलनात नेवासा येथील प्रसिद्ध शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांच्या पोवाड्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रभावी आवाज, जोशपूर्ण सादरीकरण आणि सामाजिक संदेश यामुळे त्यांच्या पोवाड्याला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सुरेश जाधव अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यकक्षिकांनी लक्ष वेधले.
यानंतर झालेल्या कवी संमेलनात दुष्काळी परिस्थिती, ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि त्यावरील उपाययोजना यांवर आधारित कविता सादर करण्यात आल्या. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित काव्यलेखन स्पर्धेत संदिप रासकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. बाळासाहेब देशमुख यांनी द्वितीय, तर रुपचंद शिदोरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. धोफ्लडीराम खांडेकर यांची कविता उत्तेजनार्थ ठरली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकप्राप्त कवींना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.


संमेलनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्राचार्या अनुरिता झगडे, मुख्याध्यापिका संगिता रासकर, माधुरी नष्टे, डॉ. मंगल बोराडे, शेख चांद हुसेन, रेवती कुलकर्णी, लक्ष्मी जाधव, दिपाली अंधारे, संगिता आतकर, कु. दिव्या पवार, रेश्‍मा पवार, भारती पाचारणे आणि अनन्या दरेकर यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


संमेलनाचे मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे यांनी प्रास्ताविकात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील विविध प्रश्‍नांकडे समाजाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम या संमेलनाच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी गोकुळ जाधव, उद्योजक दिलावर शेख, भागचंद जाधव, अण्णा जाधव, भाऊसाहेब जाधव, सागर कापसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप रासकर यांनी केले, तर आभार संदिप डोंगरे यांनी मानले.


–—
काव्यसंमेलनातून उमटली दुष्काळाची दाहकता!
ग्रामीण जीवनातील वास्तव आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचे भीषण चित्र नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातील काव्यसंमेलनातून प्रभावीपणे मांडण्यात आले. दुष्काळावरील काव्यलेखन स्पर्धेतील पुरस्कार्थी कवींसह बी. एन. शिंदे, उमेश गोरे, पूनम भुतारे, श्रेयश लहामगे, चंद्रकांत जाधव, दत्तात्रय फलके, बाळासाहेब देशमुख, अशोक मोहिते, अशोक शिंदे आणि चंद्रकांत बेलसरे यांनी आपल्या कविता सादर केल्या. पाणीटंचाई, शेतीसमोरील संकट, पशुधनाची अवस्था आणि ग्रामीण जनजीवनातील संघर्ष यांचे चित्रण या कवितांमधून करण्यात आले. त्याचबरोबर दुष्काळावर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून पुढाकार घेण्याचा संदेशही कवींनी आपल्या कवितांमधून दिला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *