भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथे गुरुपुरबनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; आहुजा परिवाराच्या वतीने प्रभात फेरीतील भाविकांचे स्वागत
‘बोले सो निहाल… सत श्री अकाल’च्या जयघोषाने तारकपूरमध्ये भक्तीचा जागर!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ‘बोले सो निहाल… सत श्री अकाल’चा जयघोष, पारंपरिक वाद्यांचा निनाद, गुरुबाणीचे स्वर आणि भक्तिमय वातावरण… अशा मंगलमय वातावरणात अहिल्यानगर शहरात शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांची 557 वी जयंती अर्थात गुरुपुरब मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. गुरुनानक देवजींच्या विचारांचा जयघोष करीत शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांनी काढलेल्या भव्य प्रभात फेरीने तारकपूर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी आहुजा परिवाराच्या वतीने प्रभात फेरीतील भाविकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) सकाळी तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथून पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रभात फेरीला प्रारंभ झाला. यामध्ये शीख, पंजाबी व सिंधी समाजातील पुरुष, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात धार्मिक ध्वज, मुखी गुरुबाणी आणि ओठांवर गुरुनानक देवजींचा जयघोष करीत भाविकांनी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.
तारकपूर परिसरातून मार्गक्रमण करीत प्रभात फेरी टॉपअप पेट्रोल पंप येथे पोहोचली असता जनक आहुजा परिवाराच्या वतीने तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभात फेरीतील वाहनावर विराजमान असलेल्या गुरुनानक देवजींच्या प्रतिमेवर तसेच धार्मिक पोथीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. गुरुनानक देवजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित भाविकांनी सामुदायिक अरदास (प्रार्थना) करीत सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांततेसाठी प्रार्थना केली. या स्वागत सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी जनक आहुजा, इंद्रजीत नय्यर, राजेंद्र कंत्रोड, बृजमोहन कंत्रोड, हरजितसिंह वधवा, बबलू आहुजा, रिकी कंत्रोड, संजय आहुजा, दिनेश कंत्रोड, जतिन आहुजा, अभिमन्यू नय्यर, किशोर कंत्रोड, अनिश आहुजा, मनमोहन चोप्रा, गौरव कंत्रोड, पियुष कंत्रोड, सौरभ आहुजा, लव खंडुजा, कुश खंडुजा, तनिश कंत्रोड, अक्षय खुराणा, गुनित कंत्रोड, सागर कुमार आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त मागील सात दिवसांपासून शहरातील विविध गुरुद्वारांसह तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथे विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अखंडपाठ, कीर्तन दरबार, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लंगर यांचा समावेश होता. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून गुरुनानक देवजी यांनी दिलेला मानवतेचा, समतेचा, बंधुभावाचा, सेवाभावाचा आणि एकतेचा संदेश समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यात आला. त्यांच्या विचारांचे स्मरण करीत समाजातील सर्व घटकांनी प्रेम, सद्भावना आणि परस्पर सहकार्याची भावना जपावी, असा संदेश या जयंती उत्सवातून देण्यात आला.

