छप्पन भोगांच्या नैवेद्याने मंदिर सजले; भजन-कीर्तनातून भक्तिरसाची अनुभूती
महाआरतीने वातावरण दुमदुमले!; अन्नकोट महोत्सवाला भाविकांची मोठी उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोट उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाला विविध प्रकारच्या मिठाई, फराळ आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा छप्पन भोग अर्पण करून महाआरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्याला शीख व पंजाबी समाजातील भाविकांसह महिला आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.
उत्सवाच्या प्रारंभी मंदिर परिसरात भजन-कीर्तनाचा भक्तिमय कार्यक्रम रंगला. गायक गिरीराज जाधव यांनी विविध भक्तिगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. ‘राम राम सीताराम…’, ‘देना हो तो दीजिये जन्म जन्म का साथ…’, ‘महाकाल सरकार मेरे…’ यांसारख्या भक्तिगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. तर ‘ओ पालनहारे…’ या गीताच्या सादरीकरणाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला. भगवान श्रीकृष्णाच्या गीतांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. उपस्थित महिला आणि भाविकांनीही भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घेतला.
दरवर्षी गोवर्धन पूजेनंतर राधा-कृष्ण मंदिरात अन्नकोट महोत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा आहे. यंदाही या परंपरेचे पालन करत भाविकांनी विविध प्रकारचे गोड पदार्थ, मिठाई, फराळ आणि पारंपरिक खाद्यपदार्थ मंदिरात आणले होते. या सर्व पदार्थांची आकर्षक पद्धतीने मांडणी करून भगवान श्रीकृष्णासाठी छप्पन भोगाचा भव्य नैवेद्य तयार करण्यात आला. भक्तांनी श्रद्धापूर्वक अर्पण केलेल्या या नैवेद्यामुळे मंदिरातील वातावरण अधिकच प्रसन्न आणि मंगलमय झाले होते.
यानंतर पंजाबी सनातन धर्मसभेचे ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, विश्वस्त मंडळातील सदस्य आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाची विधिवत महाआरती करण्यात आली. आरतीच्या वेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. आरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसाद (लंगर) आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. या अन्नकोट महोत्सवात विविध समाजघटकांतील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भजन-कीर्तन, छप्पन भोगाचा नैवेद्य, महाआरती आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

