वास्तव खबर डिजिटल मीडियाचा पहिला दिवाळी अंक प्रकाशित; समाजकारणापासून आरोग्यापर्यंत विविध विषयांचा वेध!
श्री विशाल गणपतीच्या साक्षीने ‘अहिल्या दीपोत्सव’चे प्रकाशन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी अंकांच्या माध्यमातून साहित्य, विचार आणि सामाजिक प्रश्नांना व्यासपीठ मिळत असते. याच परंपरेला पुढे नेत वास्तव खबर डिजिटल मीडियाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पहिल्या ‘अहिल्या दीपोत्सव’ दिवाळी अंकाचे प्रकाशन शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी श्री विशाल गणपती मंदिराचे महंत संगमनाथजी महाराज, मंदिराचे विश्वस्त कैलास खरपुडे, दीपक पवार, अंकाच्या संपादक वैष्णवी कदम, सौ. विधाते, नगरसेविका मंगल लोखंडे आदी मान्यवरांसह वास्तव खबर डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वास्तव खबर डिजिटल मीडियाने ‘अहिल्या दीपोत्सव’ या पहिल्या दिवाळी अंकाची निर्मिती केली आहे. या अंकामध्ये समाजकारण, राजकारण, आरोग्य तसेच वंध्यत्व निवारण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, आरोग्यविषयक जागरूकता आणि संवेदनशील विषयांवर माहितीपूर्ण लेखनाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे. विशेषतः वंध्यत्व निवारणासारख्या विषयाचा समावेश करून समाजात या विषयाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही दिवाळी अंकांची परंपरा जपण्याचा आणि वैचारिक लेखनाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम वास्तव खबर डिजिटल मीडियाने हाती घेतला आहे. पहिल्याच प्रयत्नात विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक विषयांना स्थान देत वाचकांसमोर आशयपूर्ण साहित्य सादर करण्यात आला आहे.

