• Sat. Nov 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दूध उत्पादकांची दिवाळी झाली गोड

ByMirror

Nov 7, 2026
शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवत निर्माण केला गोडवा!

अंबादास दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना साखरेचे वाटप


शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवत निर्माण केला गोडवा!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दुष्काळाचे सावट, वाढता आर्थिक ताण आणि शेती व्यवसायातील अडचणी अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी आपल्या कष्टाच्या जोरावर दिवाळीचा सण साजरा करत आहेत. अशा परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा छोटासा प्रयत्न निमगाव वाघा (ता. नगर) येथील अंबादास दूध संकलन केंद्राच्या वतीने करण्यात आला. दिवाळीनिमित्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना साखरेचे वाटप करून त्यांच्या सणाचा गोडवा वाढविण्यात आला.


जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आदर्श गोपालक पुरस्कार प्राप्त पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते दूध उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सणानिमित्त शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. जनावरांची देखभाल, चारा-पाण्याची व्यवस्था, पशुखाद्याचा वाढता खर्च आणि दुधाच्या दरातील चढ-उतार अशा अनेक आव्हानांना सामोरे जात दूध उत्पादक आपला व्यवसाय टिकवून आहेत. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता करणे जिकिरीचे ठरत आहे. अशा काळात दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून मिळालेली साखरेची भेट शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरली.


दूध उत्पादक शेतकरी हे दूध संकलन केंद्राचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच दुग्धव्यवसायाची साखळी मजबूत राहते. त्यामुळे सण-उत्सवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे महत्त्वाचे आहे. अंबादास दूध संकलन केंद्राच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि शेतकऱ्यांविषयीची कृतज्ञता अधोरेखित झाली.


यावेळी दूध डेअरीचे चेअरमन भाऊसाहेब जाधव, बापू सुंबे, पोपट भगत, रमेश कुलट, राजू डोंगरे, बाळू जाधव, उत्तम निमसे, नवनाथ जाधव, भागचंद जाधव, बापू पुंड, हुसेन शेख, बाबूभाई शेख, अजय फलके, संदीप डोंगरे, किरण ठाणगे, राजू शिंदे, भाऊ होळकर आदींसह दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *