साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; नवी मुंबईत अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या हस्ते गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ कवयित्री तथा माजी प्राचार्या हेमलता प्रदीप गीते यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत नवी मुंबई येथील कला साधना सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना ‘भारत गौरव श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कामोठे, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या हस्ते हेमलता गीते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी प्राचार्य डॉ. रत्नाकर अहिरे, प्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख, कला साधना सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष मेघा महाजन, श्रीराम महाजन यांच्यासह साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हेमलता गीते या मराठी साहित्यविश्वात संवेदनशील, अभ्यासू आणि प्रभावी कवयित्री म्हणून परिचित आहेत. आपल्या लेखणीतून विविध सामाजिक, मानवी आणि भावनिक विषयांना त्यांनी सातत्याने अभिव्यक्ती दिली आहे. त्यांच्या कवितांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक जाणिवा आणि जीवनानुभवांचे प्रतिबिंब दिसून येते. कविता लिहिण्याबरोबरच त्या प्रभावी काव्यवाचक म्हणूनही रसिकांमध्ये विशेष परिचित आहेत.
उत्कृष्ट काव्यलेखन, प्रभावी काव्यसादरीकरण आणि ललित साहित्य निर्मिती या क्षेत्रांमध्ये हेमलता गीते यांनी केलेल्या भरीव कार्याची विविध संस्थांनी दखल घेतली आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आजवर सुमारे दीडशेहून अधिक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानामुळे त्यांनी मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दिल्ली येथील दलित साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा ‘वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप अवॉर्ड’ यासह विविध मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. काव्यलेखनासोबतच साहित्यवाचन, काव्यसादरीकरण आणि ललित लेखनाच्या माध्यमातून त्यांनी साहित्य रसिकांशी सातत्याने संवाद साधला आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही प्राचार्या म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले. शिक्षण आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करणारा ‘भारत गौरव श्री’ पुरस्कार हा त्यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेचा सन्मान म्हणून प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

