4 ऑक्टोबरला पणजीत पुरस्कार सोहळा; ‘गोवा सोशल एक्सलन्स अँड इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये होणार गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून निस्वार्थपणे कार्य करणारे वाळकी (ता. अहिल्यानगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पक्षीप्रेमी विजय भालसिंग यांना स्वर कला संघ, गोवा आणि समाज कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्या वतीने ‘गोवा सोशल एक्सलन्स अवॉर्ड 2026’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक व पर्यावरणपूरक कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, रविवार दि. 4 ऑक्टोबर रोजी पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा सोशल एक्सलन्स अँड इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये मान्यवरांच्या हस्ते भालसिंग यांचा गौरव करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष निहाल सावंत यांनी ही माहिती दिली.
‘सेवेपासून सामाजिक परिवर्तनापर्यंत’ हे ब्रीदवाक्य घेऊन पणजी येथे या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार तथा गोव्याचे माजी कला, क्रीडा व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार प्रेमेंद शेटे तसेच अभिनेत्री श्रुती पारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विजय भालसिंग हे गेल्या दोन दशकांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे योगदान देत आहेत. वाळकी येथील रहिवासी असलेले भालसिंग एसटी बँकेची नोकरी सांभाळत सामाजिक कार्यासाठी वेळ देत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान अथवा वर्गणी न घेता ते अनेक सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम स्वखर्चातून राबवत आहेत.
वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यावरही त्यांचा विशेष भर असतो. वाढत्या शहरीकरणामुळे आणि सिमेंटच्या जंगलामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असताना पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी भालसिंग विविध ठिकाणी पाणवठे तयार करून पाण्याची व्यवस्था करतात. तसेच झाडांवर पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची भांडी बसवून त्यांच्या अन्न-पाण्याची सोय केली जाते.
सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने नारळाच्या सालींपासून कृत्रिम पक्षीघरटी तयार करून ती झाडांवर बसविण्याचा उपक्रमही ते राबवत आहेत. पक्ष्यांना निवारा मिळावा आणि परिसरातील जैवविविधता टिकून राहावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
आषाढी वारीच्या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीची सेवा करण्याचे कार्यही भालसिंग दरवर्षी सातत्याने करतात. त्याचबरोबर वाळकी पंचक्रोशीतील विविध सामाजिक व नागरी प्रश्नांवर आवाज उठवून ते संबंधित शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करतात. स्थानिक प्रश्न मार्गी लागावेत आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, पशु-पक्ष्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि ग्रामीण भागातील प्रश्नांसाठी केलेले कार्य याची दखल घेत विजय भालसिंग यांची ‘गोवा सोशल एक्सलन्स अवॉर्ड 2026’ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
