• Sun. Sep 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

बांधकाम कामगारांना साईश्रद्धा फाउंडेशनने दिले मोफत कौशल्य प्रशिक्षण

ByMirror

Sep 13, 2026
साईश्रद्धा फाउंडेशनच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणाला नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कामाचा व्यावहारिक सराव, आवश्‍यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्या कौशल्याला रोजगाराची जोड मिळावी, या उद्देशाने साईश्रद्धा फाउंडेशनच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘बांधकाम कामगार कौशल्य विकास वृद्धीकरण प्रशिक्षण कार्यक्रम’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रशिक्षणाला बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


प्रशिक्षणादरम्यान बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष काम करताना आवश्‍यक असलेल्या विविध कौशल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामाचा व्यावहारिक अनुभव, कौशल्यात सातत्याने वाढ, कामाची गुणवत्ता आणि त्यातून रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अमित खामकर, नगरसेवक निखिल वारे, पै. महेश लोंढे, सुजय मोहिते, बाळासाहेब पवार, प्रा. हर्षल आगळे, प्रा. भगवान काटे, वाणी मॅडम, हराळ गुरुजी, युवा नेते सोमनाथ जाधव, अभी बोरुडे, विराज टाक, साईश्रद्धा फाउंडेशनच्या सचिव कु. श्रद्धा परकाळे, अर्चनाताई परकाळे आदी उपस्थित होते. यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात फाउंडेशनच्या सचिव कु. श्रद्धा परकाळे म्हणाल्या की, बांधकाम क्षेत्रातील कामगारांना केवळ रोजगार मिळणे पुरेसे नसून, बदलत्या काळानुसार त्यांच्या कौशल्यात वाढ होणेही आवश्‍यक आहे. कामगारांच्या या गरजा लक्षात घेऊन साईश्रद्धा फाउंडेशनने कौशल्य विकास प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी अर्चनाताई परकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षणामुळे कामगारांना त्यांच्या कामातील आत्मविश्‍वास वाढविण्यासोबतच भविष्यात रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी मिळविण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कामगारांच्या हाताला कौशल्य आणि त्या कौशल्याला योग्य संधी मिळाली, तर त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात निश्‍चितच सकारात्मक परिवर्तन घडू शकते. बांधकाम कामगार हा शहराच्या विकासातील एक घटक आहे. त्यांच्या कष्टातून शहरातील घरे, इमारती आणि विविध विकासकामे उभी राहत असतात. त्यामुळे त्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज आहे.


साईश्रद्धा फाउंडेशनने बांधकाम कामगारांच्या कौशल्य विकासासाठी घेतलेला हा उपक्रम समाजोपयोगी आणि प्रेरणादायी आहे. कामगारांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असून, अशा समाजहिताच्या उपक्रमांना सदैव पाठिंबा देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *