• Thu. Sep 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

रोहित वाघ, भारती आचार्य आणि कीर्ती चक्रवर्तीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

ByMirror

Sep 10, 2026
अहिल्यानगरच्या नेमबाजांची दमदार कामगिरी

रायफल शूटिंगमध्ये अहिल्यानगरचा डंका!

अहिल्यानगरच्या नेमबाजांची दमदार कामगिरी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर रायफल शूटिंग क्लबच्या खेळाडूंनी नेमबाजीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धेत अहिल्यानगर शूटिंग क्लबचा खेळाडू रोहित संतोष वाघ याने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे देहरादून येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रायफल शूटिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.


छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील ईगल स्टार शूटिंग अकॅडमी येथे ४ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल प्रकारात रोहित संतोष वाघ याने ६०० पैकी ५६४ गुणांची शानदार नोंद करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सातत्यपूर्ण सराव, अचूक लक्ष्यभेद आणि उत्कृष्ट मानसिक एकाग्रतेच्या जोरावर त्याने ही कामगिरी साध्य केली.
याच स्पर्धेत अहिल्यानगर रायफल शूटिंग क्लबच्या भारती रामदास आचार्य हिने एअर रायफल प्रकारात प्रभावी कामगिरी केली. तिने ६०० पैकी ५७९ गुण मिळवत चौथा क्रमांक पटकावला. तिच्या या कामगिरीचेही क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
दरम्यान, अहिल्यानगरच्या नेमबाजांनी राष्ट्रीय स्तरावरही आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. २८ व्या अखिल भारतीय कुमार सुरेंद्र सिंह आंतरशालेय नेमबाजी राष्ट्रीय स्पर्धा २०२६ भोपाळ येथे पार पडली. या स्पर्धेत कीर्ती शैलेंद्र चक्रवर्ती हिने १० मीटर एअर रायफल युथ प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली.


कीर्तीने या स्पर्धेत ४०० पैकी ३९३ गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या या कामगिरीच्या जोरावर तिला टीम सुवर्णपदक, तसेच वैयक्तिक गटात कांस्यपदक मिळाले. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे कीर्तीची पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रोहित वाघ, भारती आचार्य आणि कीर्ती चक्रवर्ती हे खेळाडू खुलताबाद येथील चिश्तिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत असून, अहिल्यानगर येथील वाडिया पार्क शूटिंग क्लबमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहेत.
या गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षक अलीम शेख, ऋषिकेश दरंदले आणि सागर फाटके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अहमदनगर शूटिंग क्लबच्या सेक्रेटरी सुनीता लिपने यांचेही खेळाडूंना मार्गदर्शन मिळत आहे. प्रशिक्षकांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे खेळाडू यश मिळवत आहे.


या यशाबद्दल गुणवंत खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उपजिल्हाधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते, वरिष्ठ कक्ष अधिकारी लाड, सोल मॅडम, आमदार संग्राम जगताप, खासदार नीलेश लंके, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे, क्रीडा अधिकारी संतोष वाबळे आणि क्रीडा अधिकारी कोमल वाकळे यांनी रोहित वाघ, भारती आचार्य आणि कीर्ती चक्रवर्ती यांच्या यशाचे अभिनंदन केले. तसेच आगामी राष्ट्रीय व आंतरविद्यापीठीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *