रोज डोंगर-दऱ्या पार करून शाळेत येणाऱ्या कारगिलच्या मुलांनी शिकवला ‘शिक्षणाचा खरा अर्थ’
सचदेव यांनी मांडली भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षणाच्या समन्वयाची दिशा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बर्फाच्छादित पर्वतरांगा, खडतर भौगोलिक परिस्थिती आणि दैनंदिन जीवनातील असंख्य आव्हाने… अशा परिस्थितीतही शिक्षणाची आस मनात बाळगून दररोज मोठे अंतर पार करून शाळेची वाट धरणाऱ्या कारगिलमधील विद्यार्थ्यांच्या जिद्दीला बळ देण्यासाठी त्या भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत ECA (early childhood association) च्या वतीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित ‘पंचकोश शिक्षण पद्धती’ या विषयावर कारगिल, लडाखच्या प्रशिक्षणामध्ये अहिल्यानगर शहरातील चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव यांनी पंचकोश शिक्षण पद्धतीवर सविस्तर मार्गदर्शन केले. पंचकोश शिक्षण पध्दतीचा सर्वाधिक लाभ वयोवर्षे 2 ते 6 वर्षातील विद्यार्थ्यांसाठी होतो.
या विशेष प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतातून निवडक व्यक्तींना व्याख्यान व मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये अशोक सचदेव यांचा समावेश करण्यात आला. कारगिलसारख्या दुर्गम प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, शिक्षकांचे प्रयत्न आणि भारतीय मूल्यांवर आधारित सर्वांगीण शिक्षण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
अशोक सचदेव यांनी पंचकोश संकल्पनेतील अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश यांची सविस्तर मांडणी केली. विद्यार्थ्यांचा केवळ अभ्यासातील बौद्धिक विकास न करता त्यांच्या शरीराचा, प्राणशक्तीचा, मनाचा, बुद्धीचा तसेच आनंदी आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय शिक्षणपरंपरेतील ही प्राचीन आणि समग्र संकल्पना आधुनिक शिक्षणव्यवस्थेत प्रभावीपणे रुजविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रत्येक पैलूला स्पर्श करणारे शिक्षण देणे, त्यांच्या क्षमता ओळखणे आणि त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सक्षम करणे, हा पंचकोश शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याचे सचदेव यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाचे सर्वांत भावनिक आणि प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे कारगिलमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असतानाही अनेक विद्यार्थी दररोज मोठे अंतर पार करून शाळेत पोहोचतात. शिक्षण घेण्याची त्यांची जिद्द, शिक्षकांची बांधिलकी आणि प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञानाची वाट धरलेली ही पावले प्रशिक्षणार्थींसाठी प्रेरणादायी ठरली. डोंगर-दऱ्या, थंडी आणि आव्हानात्मक परिस्थिती यांना न जुमानता शिक्षणासाठी पुढे जाणारी ही मुले समाजाला एक मोठा संदेश देतात. शाळा ही केवळ चार भिंतींची जागा नसून स्वप्नांना आकार देणारे आणि आयुष्य बदलणारे केंद्र आहे, याची जाणीव कारगिलच्या या अनुभवातून झाली.
यावेळी अशोक सचदेव म्हणाले की, “भारतीय शिक्षणपद्धतीची मुळे आपल्या संस्कृतीत आणि ज्ञानपरंपरेत खोलवर रुजलेली आहेत. पंचकोश शिक्षण विद्यार्थ्याच्या केवळ बौद्धिक विकासावर भर न देता त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा विचार करते.” ते पुढे म्हणाले की, कारगिलच्या भूमीत मिळालेला अनुभव शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक समृद्ध करणारा ठरला. अत्यंत कठीण परिस्थितीतही शिक्षणाची आस जपणारी मुले आणि त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे शिक्षक पाहणे हा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे. या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान आणि अनुभव शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून भारतीय मूल्ये आणि आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून NIPUN भारत धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करून पूर्वप्राथमिक शाळांमधील शिक्षकांसाठी ECA Summit आयोजित करण्यात आली होती. बालकांच्या पायाभूत शिक्षणाला भक्कम आधार देणे, शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य वाढविणे आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक व परिणामकारक पद्धतींचा वापर करणे, हा या समिटचा केंद्रबिंदू होता.
यावेळी डॉ. फारूक वासिल (संचालक, BELA आणि Thinksite) यांनी समकालीन जगातील शिक्षण आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासावर मार्गदर्शन केले. संतोष व्हेंट्रिलोक्विस्ट आणि अस्मा झैदी (संस्थापक, Let’s Read कार्यक्रम) यांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अधिक मनोरंजक पद्धतीने कसे विकसित करता येईल, याबाबत संवादात्मक मार्गदर्शन केले. शाह इफला यांनी कथाकथनाच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. लहान मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविताना गोष्ट, कल्पनाशक्ती आणि संवाद यांचा प्रभावी वापर कसा करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. कौसर रझवी यांनी लहान वयातील मुलांवर हवामान बदलाचा होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले. समरीन हमदानी यांनी बाल संरक्षण हा NEP आणि NIPUN भारताच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा घटक असल्याचे स्पष्ट केले. डॉ. पद्मा ओथसल यांनी SECMOLमधील शिक्षण पद्धतीची ओळख करून देत स्थानिक परिस्थितीशी जोडलेले शिक्षण किती प्रभावी ठरू शकते, यावर प्रकाश टाकला.
कारगिलच्या भूमीत झालेल्या या प्रशिक्षणातून भारतीय ज्ञानपरंपरा, आधुनिक शैक्षणिक धोरणे, बालकांचा सर्वांगीण विकास आणि प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. अशोक सचदेव यांच्या मार्गदर्शनामुळे अहिल्यानगरच्या शैक्षणिक क्षेत्रालाही राष्ट्रीय स्तरावर विशेष स्थान मिळाले.

