माजी नगरसेवक संजय झिंजे यांची महापौरांकडे मागणी; प्रमुख गणेश मंडळे व विसर्जनस्थळी सुविधा देण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या काळात अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महिलांसाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांजवळ तसेच विसर्जनस्थळी महानगरपालिकेच्या वतीने फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अहिल्यानगर शहरात लवकरच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, शहरातील विविध गणेश मंडळांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील आकर्षक देखावे पाहण्यासाठी तसेच गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक शहरात दाखल होतात. यामध्ये महिला व मुलींची संख्याही मोठी असते.
मात्र, शहरातील अनेक भागांत महिलांसाठी पुरेशा सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने आतापासूनच आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी झिंजे यांनी केली आहे.
अहिल्यानगर शहरातील बाजारपेठा, प्रमुख चौक आणि गर्दीच्या भागांमध्ये विविध कामांसाठी मोठ्या संख्येने महिला येत असतात. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्यामुळे महिलांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची गर्दी अनेक पटींनी वाढते. त्यामुळे महिलांसाठी स्वच्छतागृहांचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या महिला तसेच विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहासारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांची कुचंबणा होणे ही गंभीर बाब आहे, असे झिंजे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात महानगरपालिकेने फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ स्वच्छतागृह उभारून न थांबता त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसेच स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी नियुक्त करावेत, अशीही मागणी झिंजे यांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या दिवशी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात. त्यामुळे विसर्जन विहिरी असलेल्या ठिकाणीही फिरती स्वच्छतागृहे उभारावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
विसर्जनाच्या दिवशी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन स्वच्छता, पाणी, प्रकाशयोजना, वाहतूक आणि नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा यांचे योग्य नियोजन महापालिकेने करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या शांतता समिती आणि गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत आपण महिलांसाठी स्वच्छतागृहांची आवश्यकता प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे संजय झिंजे यांनी निवेदनात नमूद केले आहे. गणेशोत्सव हा सर्व समाजघटकांचा उत्सव असून, या काळात शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. विशेषतः महिलांसाठी स्वच्छतागृह ही सुविधा केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता शहराच्या विविध भागांत कायमस्वरूपी उपलब्ध असणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शहराच्या प्रथम नागरिक आणि एक महिला म्हणून संवेदनशीलता दाखवत गणेशोत्सवाच्या काळात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला तातडीने निर्देश द्यावेत,” अशी विनंती संजय झिंजे यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

